नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील खेडदिगर गावाजवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने खेतिया पोलिस ठाण्यातील कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, मध्यप्रदेश राज्यातील पानसेमल येथील व खेतिया पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेले हवालदार हरीओम रामलखन यादव (वय ४३) खेतियाकडून शहाद्याकडे दुचाकीने (क्र.एम.पी.१० एमएम ७५२२) जात होते.
यावेळी एका चारचाकी वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.जी.जे.०१ आरएच १६७७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात खेडदिगर गावाजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात पोलिस कर्मचारी हरीओम यादव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत सैय्यद आरीफ बाबु यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात चारचाकी वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदिपसिंग राजपूत करीत आहेत.








