नंदुरबार l प्रतिनिधी
कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या सयुंक्त विद्यमाने नंदुरबार तालूक्यातील जूनमोहिदा येथे गुलाबी बोंडअळी नियंत्रणाचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहे.
मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर गूलाबी बोंडअळीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव वाढत आहे. गूलाबी बोंडअळीच्या जास्त प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे गूलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जाते आहे. कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या सयुंक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रम नंदुरबार जिल्ह्यात राबविला जात आहे.
प्रकल्पाअंतर्गत गूलाबी बोंडअळीच्या मिलनात अडथळा निर्माण करणार्या औषधीचा वापर केला जात आहे. गूलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या मिलनात अडथळा निर्माण करणारे औषध विकसित करण्यात आले आहे. कापसाच्या शेतात दर पाच मीटर अंतरावरील झाडाला वरून ६ इंच खाली बाजरीच्या दाण्यासारखे औषध लावायचे आहे. एक एकरात चारशे ठिकाणी हे औषध एक महिन्याच्या अंतराने तीनदा लावणे अपेक्षित आहे.
त्यामुळे पतंगाच्या मिलनात अडथळा निर्माण होऊन गूलाबी बोंडअली नियंत्रण होते. या प्रयोगाची तुलना एकात्मिक गूलाबी बोंडअडी नियंत्रण पद्धतीशी केली जाणार आहे. हा प्रयोग वरिष्ठ शाश्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आर. एस. दहातोंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली व पिक संरक्षण तज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार पी. सी. कुंदे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने सुरु आहे.
तसेच या प्रकल्पात तांत्रिक नोंदी आणि प्रयोग संचालनासाठी यंग प्रोफेशनल-१ संदिप कुवर हे काम पाहत आहेत. सदरील प्रयोग जूनमोहिदा ता. नंदुरबार येथे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य केंद्रीय कापूस संसोधन संस्था, नागपूर यांनी केले आहे.