शहादा l प्रतिनिधी
येथील सोनामाई संस्थेच्या सचिव वर्षा जाधव यांनी गेली २५ वर्षे अखंडपणे कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना रक्षाबंधनाला स्नेहाच्या धाग्याने बांधून ठेवत भाऊ आणि बहिणीचे पवित्र नाते जोपासले आहे. रक्षाबंधनाच्या ओवाळणीतून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य , गणवेश , दप्तर आदी वितरित करत एक अनोखी परंपरा जपली आहे.
यंदा हे या उपक्रमाचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. त्यानिमित्ताने कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनी शारदा कन्या विद्यालयातील गरजू विद्यार्थिनींना गणवेश व साहित्य शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव , सोनामाई संस्थेच्या सचिव वर्षा जाधव , प्राचार्य ए.एन. पाटील , प्राचार्य डॉ. व्ही . एस . पाटील , मुख्याध्यापक एम. बी. मोरे , प्राचार्य एस.झेड. सय्यद , पर्यवेक्षक एन. बी.कोते , प्रा. अनिल साळुंके , प्रमोद जाधव , विजय जाधव व बंजारा कर्मचारी सेवा संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल साळुंके , सूत्रसंचालन श्रीमती प्राजक्ता पारखे तर आभार संदीप मोरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शारदा कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. वर्षा जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत गेल्या २५ वर्षा पासून करीत असलेल्या अनोख्या रक्षाबंधनाच्या निमित्त विविध राबविलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.








