नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नवापाडा – कुंभारपाडा रस्त्यावर दुचाकी घसरल्याने एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील नवापाडा येथील उमेश शंकर पाडवी ( वय २५ ) हे दुचाकीने नवापाडाहून कुंभारपाडाकडे जात होते . यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने त्यांचे नियंत्रण सुटल्याने नवापाडा ते कुंभारपाडा रस्त्यावर दुचाकी घसरल्याने अपघात घडला . घडलेल्या अपघातात उमेश पाडवी यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला . तसेच दुचाकीचेही नुकसान झाले . याबाबत गंगाराम शंकर पाडवी यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात मयत उमेश पाडवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३८ , ४२७ , मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ.कोकणी करीत आहेत .