शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील अनरद येथे एकाच रात्री तब्बल दहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याने गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . याबाबत सारंगखेडा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली असून याबाबत पोलिसांनी ठोस उपायोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , दि .१८ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शहादा तालुक्यातील
अनरद येथील सवतानगर मध्ये राहणाऱ्या राजू शिवदास कोळी यांच्या आई राहत असलेल्या घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याने घरात प्रवेश करून पत्र्याच्या पेटीत ठेवलेली ११ हजाराची रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद राजू कोळी यांनी सारंगखेडा पोलिसात दिली . त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर याच रात्री चोरट्यांनी कल्पना रमेश माळी हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असता याची संधी साधत घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटामधील कपडे व सामान अस्ताव्यस्त करून पाच भार चांदी व दोन ग्रॅम सोने , तसेच देवाऱ्यातील देवदेखील चोरून नेल्याचे समजते . तसेच इतर काही घरामध्ये देखील चोरट्यांनी हातसफाई केल्याचे समजते .कैलास रमेश पाटील यांच्या घरातदेखील चोरीचा प्रयत्न केला असता यावेळी त्यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी चोरट्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्याकडील हत्याराने कैलास पाटील यांना जखमी केल्याने त्याच्या डोक्यावर तीन ते चार टाके पडल्याची माहीत मिळाली आहे . यावेळी त्यांनी सांगितले की , सदर चोरटे तीन ते चार जण असून त्यांच्याकडे हत्यारदेखील आहे . याबाबत कैलास पाटील यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा करण्यात आला आहे .नंदुरबार जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली असून याबाबत पोलिसांनी ठोस उपायोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.