नंदुरबार l प्रतिनिधी
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरातील सुभाष चौकात दहीहंडीची धूम पाहायला मिळाली.पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात ९ व्यायाम शाळेच्या गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडत जल्लोषोत्सव साजरा केला. साधारणतः ३ ते साडेतीन तास चाललेल्या दहीहंडी महोत्सवात युवकांच्या सळसळता जल्लोष नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर प्रथमच दहीहंडी निर्बंध मुक्त साजरी करण्यात आली. शांतीसागर सुपडू पैलवान मराठे यांच्या जय बजरंग व्यायाम शाळेच्या वतीने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी खंडेश्वरी बाबा (सौराष्ट्र) यांच्या हस्ते दहीहंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. भागवताचार्य प.पु अविनाश जोशी,पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन झाले.
सकाळी १० वाजे नंतर शहरातील विविध मार्गांवरून व्यायाम शाळेचे गोविंदा पथके सुभाष चौकात पारंपारिक ढोल ताशांवर नृत्य करीत दाखल होत होते. सर्वप्रथम होलर व्यायाम शाळेचा गोविंदा पथक दाखल झाल्यानंतर दहीहंडी फोडण्याच्या मान त्यांना मिळाला.
साडेअकरा वाजेपर्यंत एकापाठोपाठ व्यायाम शाळेचे पथके दहीहंडी फोडण्यासाठी दाखल झाली. दहीहंडी महोत्सवात सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने,जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष शेखर मराठे, जितेंद्र मराठे,संजय भदाने,गिरजा गवळी, संजय चौधर, क्षितिष लवांदे उपस्थित होते.
दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी
कोरोना महामारीच्या २ वर्षानंतर निर्बंधमुक्त दहीहंडी यंदा उत्साहात साजरी करण्यात आली. सुभाष चौकात दहीहंडी पाहण्यासाठी लहानांपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वांचीच गर्दी उसळली होती. अनेक शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. सुभाष चौक चारही बाजूंनी गर्दीने खचाखच भरलेला होता. यावेळी पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला.
या गोविंदा पथकांच्या सहभाग
दहीहंडी फोडल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गोविंदा पथकातील कार्यकर्त्यांच्या सत्कार करण्यात आला. श्रीकृपा होलारवाडा व्यायाम शाळा,द्वारकाधीश व्यायाम शाळा, जय हनुमान व्यायाम शाळा, जय संताजी व्यायाम शाळा, होलार समाज व्यायाम शाळा, तेलीवाड्याच्या राजा व्यायाम शाळा, श्री रोकडेश्वर हनुमान व्यायाम शाळा,माळीवाड्याच्या राजा व्यायाम शाळा, वायुपुत्र व्यायाम शाळेच्या गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडली.