नंदुरबार l प्रतिनिधी
आज दि. 20 ऑगस्ट रोजी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या विकासासंदर्भात बैठक झाली.
या बैठकीस नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात,पर्यटन संचालक श्री.सावळकर ,उपजिल्हाप्रमुख तथा जि. प. सदस्य गणेश पराडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बबनराव थोरात यांनी तोरणमाळ विकास आराखडा सादर करून तोरणमाळ विकासासंदर्भात चर्चा केली. तोरणमाळचा विकास झाल्यास दरवर्षी लाखोच्या संख्येने तोरणमाळ या आध्यात्मिक व प्रेक्षणीय स्थळाला भेट देणाऱ्या भाविक व निसर्गप्रेमींना नक्कीच भुरळ घालेल. तोरणमाळ व आजुबाजुच्या परिसरात वृक्षलागवड झाल्यास पर्यटन विकासासोबतच पर्यावरणाचाही समतोल राखण्यात यश येईल असे मत गणेश पराडके यांनी मांडले. व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारा नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,जिल्हाप्रमुख आमशा पाडवी,डॉ विक्रांत मोरे,तसेच वनाधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी तोरणमाळ विकासासंदर्भात आपले विचार मांडले.तोरणमाळच्या विकासाला लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी धडगांव तालुकाप्रमुख महेशकुमार पाडवी, युवासेनेचे जिल्हा चिटणीस योगेश पाटील बैठकीस उपस्थित होते.