नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी बाजारात अतिक्रमण असलेल्या दुकानाच्या जागेच्या वादातून एकास लोखंडी पाईप व हातोडीने डोक्यावर मारुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाडा येथील दिनेश मोता वसावे व रामसिंग कागड्या यांच्यात मोलगी गावातील बाजारात अतिक्रमण असलेल्या दुकानाच्या जागेवरुन वाद होता.
या वादातून दिनेश वसावे यांचे मोलगी गावात असलेल्या बाजारात भाजीपाल्याचे दुकान नोटीस न देता तोडत होते. यावेळी दिनेश वसावे यांनी दुकान का तोडत आहेत असे विचारले. याचा राग आल्याने रामसिंग कागड्या वसावे याने लोखंडी पाईपने दिनेश वसावे यांच्या उजव्या पायाचे गुडघ्यावर, कंबरेवर मारले.
तसेच रायसिंग कागड्या वसावे याने हातोडीने उजव्या कानावर व डोक्यावर मारुन गंभीर दुखापत केली. तसेच रुल्या राया वसावे, रुमल्या वेस्ता वसावे, सुऱ्या हुऱ्या वसावे, दिलीप धर्मा वसावे, कालूसिंग राया वसावे, शिवा धर्मा वसावे (सर्व रा.मोलगीचा ओलीदोपाडा ता.अक्कलकुवा) यांनी हाताबुक्यांनी मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
दिनेश वसावे यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत दिनेश वसावे यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वाघ करीत आहेत.