नंदुरबार l प्रतिनिधी
भूमिहिन दारिद्ररेषेखालील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या दारिद्ररेषेखालील भूमिहिन कुटुंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) देण्याची योजना सामाजिक न्याय विभागातर्फे 100 टक्के अनुदानित राबविण्यात येते. या योजनेसाठी जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी, जमीन मालकांनी 30 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील कुटूंबाला 4 एकर कोरडवाहू (जिरायत) जमीन किंमत कमाल 5 लाख प्रती एकर किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल 8 लाख प्रती एकर जमीन उपलब्ध करुन देण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भूमिहीन असावा, लाभार्थ्यांकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला दाखला असावा. लाभार्थ्यांचे किमान वय 18 वर्ष व कमाल 60 वर्ष असावे.विधवा किंवा परितक्या असल्याचा दाखला, अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचार ग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जमीन विक्री प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे : जमिनीचा सातबारा उतारा तसेच मागील पाच वर्षांचे फेरे असल्याची नोंद उतारा, 8अ दाखला, विहीत नमुन्यात 100 रुपये बाँड पेपरवर शपथपत्र, गाव नकाशा, निर्विवाद प्रमाणपत्र दुय्यम निबंधक श्रेणी (तलाठी ), चतु;सिमा, मुल्याकंन प्रमाणपत्र, जमीन संपादित केली नसल्याबाबत तलाठी यांचे प्रमाणपत्र, बोजा प्रमाणपत्र, मध्यवर्ती सहकारी बँक,राष्ट्रीयकृत बँक, भूविकास बँक, पतसंस्थाचे बेबाकी प्रमाणपत्र, शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा टाचन नकाशा, शेतजमीन विक्री बाबत नाहरकत प्रमाणपत्र, नोट कॅम फोटो, मोका पाहणी, मागील तेरा वर्षाचे फेरफार इत्यादी कागदपत्र जोडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.