नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा येथे एकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा येथील मंगेश टेडग्या वसावे (वय २८) याने पिवळ्या रेशनकार्डमधील नाव कमी करायचे असल्याने सोन्या टेडग्या वसावे व कालुबाई सोना वसावे यांच्याकडे आधारकार्ड मागितले असता आधारकार्ड न देता वेळोवेळी मंगेश वसावे यांना जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच कालूबाई वसावे यांनी शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. तर कालूबाई वसावे हिचा भाऊ विनेश पारशी वसावे हा शिलाबाई वसावे यांच्या घरी जावून त्यांचे पती मंगेश वसावे यांना मारहाण केली.
तसेच सोना टेडग्या वसावे, कालूबाई सोना वसावे व विनेश वसावे यांनी मंगेश वसावे यांना वेळोवेळी शारीरीक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून मंगेश वसावे यांनी शेतातील महूच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
याबाबत शिलाबाई वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र महाजन करीत आहेत.