नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेचे खा.संजय राऊत यांना केंद्रीय तपास यंत्रणेने जाणुन-बुजून अटक केली असून देशात चौकशीच्या नावाखाली लोकशाहीचा खून करण्यात येत आहे, खा.राऊत यांच्या अटकेचा नंदुरबार जिल्हा शिवसेनेतर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. तसे निषेधाचे निवेदन शिवसेनेचे नंदुरबार प्रमुख राजधर माळी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, केंद्रीय तपास यंत्रणेने जाणून-बुजून हेतूपुरस्करपणे शिवसेना नेते खा.संजय राऊत यांना चौकशी करुन अटक केली. कारण शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत हे एकमेव नेते भाजपाला पूरुन उरत आहेत.
आजच्या परिस्थितीत देशात भाजपच्या विरोधात जो कोणताही पक्ष बोलेल किंवा त्यांच्यातला नेता म्हणून त्याला कोणत्याही खोट्या प्रकरणात ईडीमार्फत चौकशी करुन जेलमध्ये टाकायचं किंवा घाबरुन भाजपमध्ये प्रवेश कर असं धमकवायचं, असे घाणेरडे प्रकार देशातील केंद्र सरकारमध्ये बसलेले दोन बडेनेते करत आहेत.
या देशात लोकशाहीचा पूर्णपणे खून करण्यात येत आहे आणि खा.संजय राऊत यांना याआधी अनेक धमक्या दिल्या गेल्या. परंतु खा.संजय राऊत हे शिवसेना सोडायला तयार नव्हते आणि भाजपात जायलाही तयार नव्हते, त्यामुळे त्यांना चौकशीच्या नावाखाली इडीमार्फत अटक करण्यात आली. याचा निषेध म्हणून शिवसेना नंदुरबार जिल्हाप्रमुख आमदार आमश्यादादा पाडवी यांचे आदेशान्वये नंदुरबार शिवसेना महानगर व शहरतर्फे आम्ही तीव्र निषेध करत आहोत.
निवेदनावर नंदुरबार शहर प्रमुख राजधर माळी, महानगर प्रमुख पंडीत माळी, भक्तवत्सल सोनार, युवासेना जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, उपजिल्हा अधिकारी सागर पाटील, युवासेना नंदुरबार शहर प्रमुख दादू कोळी, दिनेश भोपे, सौ.सुरेखा वाघ, आनंद पाटील, मोन्टी भाबड आदींच्या सह्या आहेत.