नंदुरबार ! प्रतिनिधी
नगरपरिषदेची इमारत बांधकामाची शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पाहणी केली. पुढील वर्षात मे-जून महिना अखेरीस बांधकाम पूर्णत्वास येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असल्याचा मानस रघुवंशी यांनी व्यक्त केला.
नंदुरबार नगरपालिकेचे सध्या कामकाज जयप्रकाश नारायण रुग्णालयात सुरू आहे. पालिकेची स्वतंत्र इमारत असावी म्हणून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर केला होता. शहरातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या ठिकाणी पालिकेचे भव्य वास्तूचे बांधकाम करण्यात येत आहे. त्या बांधकामाची माजी आ. रघुवंशी यांनी पाहणी केली.
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, शहरात अप्रतिम वास्तू बनवण्याच्या संकल्प केला होता. नाशिक विभागात अत्यंत सुंदर व देखणी पालिका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.लोकं पालिकेची इमारत पाहायला येतील असे बांधकाम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक दीपक दिघे, फारूक मेमन, चेतन वळवी व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांसाठी सुसज्ज दालन
नूतन इमारतीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते तसेच विविध विषय समितीच्या सभापतींसाठी स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात त्या-त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी कामकाज हाताळतील.
सभागृहात २०० व्यक्ती बसण्याची सुविधा
नूतन वास्तूमध्ये स्वतंत्र सभागृह असेल त्या सभागृहात पालिकेच्या विविध बैठका होतील. पालिकेचे विविध कार्यक्रम सभागृह होतील. साधारणतः दीडशे ते दोनशे व्यक्ती बसण्याची आसन व्यवस्था सभागृहात असेल अशी माहिती देण्यात आली.