नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील धुळे-सुरत महामार्ग क्र.६ वर पेट्रोलचे पैसे मागितल्याचा राग आल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास तलवारीने हातावर वार करुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील जामतलाव येथील मुऱ्या उर्फ मुकेश सुरेश गावित हा नवापूर शहरातील धुळे-सुरत महामार्ग क्र.६ वरील बालाजी पेट्रोलियम पंपावर जिओ बि.पी. पंपावर फिलर म्हणून कामाला असलेल्या युवराज पुंडलिक वाघ यांच्याकडून १०० रुपयाचे स्कुटीमध्ये पेट्रोल भरले.
युवराज वाघ यांनी पेट्रोलचे १०० रुपये मागितले असता राग आल्याने मुऱ्या उर्फ मुकेश सुरेश गावित याने तलवार काढून युवराज वाघ यांच्यावर वार केला असता त्यांनी उजवा हात पुढे केल्याने त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
याबाबत युवराज वाघ यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात मुऱ्या उर्फ मुकेश सुरेश गावित याच्याविरुद्ध भांदवी कलम ३०७ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.








