शहादा l प्रतिनिधी
सोमवार दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या (एम.फुक्टो) आवाहनानुसार प्राध्यापकांच्या प्रलंबित न्याय मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी सहसंचालक उच्च व तंत्रशिक्षण जळगाव विभाग, जळगाव येथे दुपारी 4 वाजता एम. फुक्टोचे उपाध्यक्ष व एन.मुक्टो संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली एन. मुक्टो प्राध्यापक संघटनेतर्फे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील प्राध्यापकांनी यावेळी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन एन. मुक्टो प्राध्यापक संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने राज्यात दि. 18 जुलै 2018 यूजीसी रेगुलेशनची झालेली अर्धवट अंमलबजावणी व प्राध्यापकांचे संपकाळातील 71 दिवसाचे बेकायदेशीर वेतन कपातीचा अर्धवट परतावा या बाबींच्या निषेधार्थ व डीसीपीएस धारक प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, अर्धवेळ प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करणे, यूजीसी धोरणानुसार महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त 100% पदे त्वरित भरणे, कॅस अंतर्गत सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांची पदोन्नती ड्यू दिनांक पासून करणे, कॅस अंतर्गत प्राध्यापकांची पदोन्नती करिता विद्यापीठाच्या स्थान निश्चिती शिबिरासोबत वेतन निश्चितीचे शिबिर आयोजित करणे, एम. फिल. धारक प्राध्यापकांचे थांबवलेले कॅस चे प्रमोशन त्वरित लागू करणे, एम. फील. व पीएचडीच्या वेतन वाढी पूर्ववत सुरू करणे,
महाविद्यालयीन नॅक मूल्यांकनाची फी शासनाने भरणे व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाविद्यालयांना 20 टक्के. वेतनेत्तर अनुदान देणे आदी प्रलंबित न्याय मागण्यांकरिता आतापर्यंत राज्यभर वेगवेगळ्या टप्प्यात लोकशाही मार्गाने आंदोलन पुकारलेले आहेत. तरीसुद्धा शासनाने प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांचा आजपर्यंत गांभीर्याने विचार केलेला नाही.
म्हणून नाईलाजाने दि.1 ऑगस्ट रोजी दु. 4 वाजता सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण जळगाव यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करावे लागत आहे. तरी याप्रसंगी जास्तीतजास्त प्राध्यापकांनी उपस्थित रहावे असे आवाहन एन.मुक्टो केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल पाटील, सचिव प्रा. डॉ. गौतम कुवर, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. एकनाथ नेहते, जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. किशोर कोल्हे, सचिव डॉ. आकाशगीर गोस्वामी, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रा. दिनेश पाटील, सचिव प्रा.डॉ.संजय खैरनार, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष प्रा. अधिकार बोरसे, सचिव प्रा. एस. एस. पाटील यांनी केले आहे, अशी माहिती एन. मुक्टो. केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी दिली आहे.