नंदुरबार l प्रतिनिधी
व्यारा ते छूकीदरम्यान ताप्ती गंगा एक्स्प्रेसने प्रवास करत असणाऱ्या एका प्रवाशाच्या खिशातून आठ हजार रुपये काढून नेणाऱ्या तिघा आरोपींना नंदूरबार न्यायालयाने एक वर्ष सक्तमजूरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ताप्ती गंगा एक्स्प्रेसने दि.२२ जून २०१६ रोजी उत्तर प्रदेशातील गव्हाणे येथील रहिवासी जयप्रकाश नोखाईराम हरिजन हे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या खिशात असलेली आठ हजाराची रक्कम सिद्धीकी शाहनवाज सैय्यद , मोहंमद अमीन मोहंमद अहमद व सैय्यद कलम सैय्यद भिकन सर्व रा.उनपटीया, सुरत यांनी लंपास केली.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास तपासी अंमलदार पोहेकॉ.प्रदीप राणे यांनी केला. चोरीस गेलेले आठ हजार रुपये हस्तगत करुन तिघा संशयितांविरोधात सबळ पुरावे गोळा करुन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानुसार नंदुरबार न्यायालयाने दि.२८ जुलै रोजी तिघा संशयितांना एक वर्ष सक्तमजूरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.जी.चव्हाण यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सहकारी अभियोक्ता ॲड.सुनिल पाडवी यांनी पाहीले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश वावरे, प्रभारी अधिकारी लोहमार्ग पोलिस ठाणे नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोहेकॉ. कैलास चौधरी यांनी कामकाज केले आहे.