नंदूरबार । प्रतिनिधी
केंद्र शासनाकडून बहुमताचा व सत्तेचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले धुळ्यातील राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरण उद्घाटनासाठी आज 30 रोजी झाले त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे निर्धारित वेळेपूर्वीच धुळ्यात दाखल झालेत.उद्घाटनानंतर त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.
केंद्र सरकार आपल्या सत्तेचा आणि बहुमताचा दुरुपयोग करीत असल्याचा धागा पकडून शरद पवार यांनी परवा संसदेत घडलेल्या प्रसंगाची आठवण करून दिली. ते म्हणाले, काँग्रेसच्या खासदाराकडून राष्ट्रपती बद्दल चुकून राष्ट्रपत्नी असा उल्लेख झाला. अर्थात ही चूकच आहे. त्यांनी तशी माफी मागण्याचीही तयारी दर्शवली. परंतु टीका काँग्रेस पक्षाच्या नेत्यासोनिया गांधी यांच्यावर होत असल्याने त्यांनी दुसऱ्या एका खासदार भगिनीला फक्त एवढीच विचारणा केली की, यात माझा दोष काय? माझ्यावर टीका का करताय? परंतु असे असताना केंद्रातील सत्ताधारी खासदार, मंत्री हे सोनिया गांधींच्या अंगावर चक्क धावून आलेत.
मंचावर बसलेल्या अध्यक्षांच्या समोर सुरू असलेला हा प्रकार लोकशाहीला धरून नाही. एवढी हिम्मत यांच्यात आली कुठून, अर्थात बहुमताचा आणि सत्तेचाच हा दुरुपयोग आहे. आम्ही सांगू तेच घडेल आणि आम्हाला हवे तेच बोलावे, अशा पद्धतीने सत्ताधारी वागत आहेत.
या देशाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. यातून भारतात सारख्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशाबद्दल जगभर प्रतिमा मलीन होते आहे. शिवाय सामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार उरलेला नाही. लोकप्रतिनिधी बोलले तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. इतकेच नव्हे तर अंगावर धावूनही येतात. ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे शरद पवार म्हणालेत.
काही खासदारांनी सोनिया गांधींना तेथून सुखरूप बाहेर काढले नसते तर कदाचित चित्र वेगळे राहिले असते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
शरद पवार पुढे म्हणाले, ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नाही,अशा इंग्रजांना देखील सामान्य माणसांनी देखील पळवून लावले. त्यांचे साम्राज्य उलटले तेव्हा या हुकूमशहांचे काय? असा असा सवाल करीत देशातील सामान्य माणसांच्या हातात ही ताकद असून ते आपल्या ताकतीचा वापर करतील आणि हुकूम शहांचे सत्ता उठवून लावतील, असा विश्वासही श्री.पवार यांनी धुळ्यात बोलताना व्यक्त केला.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार अनिल गोटे व सहकाऱ्यांनी या राष्ट्रवादी भावनाचे नूतनीकरण केले आहे. यासाठी आज श्री.पवार आले होते. ज्येष्ठ नेते आ.एकनाथ खडसे नंदूरबार जिल्हा अध्यक्ष डॉ.अभिजीत मोटे यांचीही उपस्थिती होती.