नंदूरबार l प्रतिनिधी
खान्देशात कर्मविर म्हणून ओळख असलेले रावल गढीचा ऐतिहासिक असा वारसा असून या घराण्याचा कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा आणि दातृत्वाचा वारसा सरकारसाहेब रावल यांनी जोपासण्याचे काम केले असून शिक्षण संस्था असो किंवा रावल उदयोग समुह असो या माध्यमातून त्यांनी ते दाखवून दिले असल्याचे गौरवोदगार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोंडाईचा येथे काढले.
आज दोंडाईचा जि.धुळे येथील प्रसिध्द उदयोगपती सरकारसाहेब रावल यांचा अमृत महोत्सवी सोहळा, दादासाहेब रावल उदयोग समुहाचा सुवर्ण महोत्सव, स्वोध्दारक विदयार्थी संस्थेचा शताब्दी महोत्सव तसेच स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने 75 फुटी ध्वजस्तंभाचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम ना. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलतांना ना.फडणवीस साहेब म्हणाले की, आपल्या भागातील शेतक-यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लोकांचया हातांना काम मिळावे यासाठी 50 वर्षापूर्वी स्टार्च फॅक्टरीच्या माध्यमातून मकावर प्रकिया करणारा उदयोग उभारण्याचे महान कार्य रावल परीवाराने केले. त्यास 60 मेट्रीक टन मका प्रकिया क्षमतेपासुन ते 500 मेट्रीक टन दैनंदिन प्रकिया सरकारसाहेब रावल यांनी ही किमया करून दाखविली. उदयोगासोबतच सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात, आज रावल परीवाराने उभारलेल्या शिक्षण संस्थेच्या कृषी महाविदयालय आणि बहुउददेशीय सकुंलाचे लोकार्पण केले, आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रात मोठे बदल करण्याबाबत सुचित केले असून त्यामुळे कृषीचे शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांच्या अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे.
सुलवाडे-जामफळ योजनेचे श्रेय हे रावल-भामरे-महाजन यांचे
शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली सुलवाडे-जामफळ-कनोली उपसासिंचन ही योजना मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष बाब म्हणून मंजूर केली. आणि त्यासाठी खरा पाठपुरावा तत्कालीन मंत्री जयकुमार रावल, खा, सुभाष भामरे आणि गिरीष महाजन यांनी वेळोवेळी केला. त्यामाध्यमातून आज ही योजना प्रगती पथावर आहे. हे नेते या योजनेचे श्रेय मला देतात, परंतु या योजनेचे खरे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सतत पाठपुरावा करणारे या त्रिमूर्तींचेच आहे. असेही फडणवीस म्हणाले.
जलयुक्त शिवार योजनेचा या भागाला झाला मोठा लाभ
मागील भाजप सरकारच्या काळात जलयुक्त् शिवार ही योजना सरकारने राबविली होती. त्या योजनेचा सकारात्म्क परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झाला. तसा या भागालाही मोठा लाभ झाला. कायम दुष्काळी असलेला हा भाग मागील काही वर्षापासून मोठयाप्रमाणावर टंचाईमुक्त् झाल्याचे दिसून येत आहे. नवीन स्थापन झालेले हे सरकार पुन्हा नव्याने ही योजना प्राधान्याने राबविणार असल्याचे ना. फडणवीस म्हणाले.
प्रकाशा-बुराई योजनेला गती देणार –
शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला सत्तेत असतांना गती देण्याचे काम आम्ही केले होते, परंतु मागील सरकारने या योजनेला बारगळवण्याचे काम केले. आता या योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता असून लवकरच ती देण्यात येईल. व अपूर्ण कामाला गती देण्याचे काम हे नवीन सरकार करणार असल्याचे आश्वासन ना. फडणवीस यांनी दिले.
यावेळी माजी मंत्री गिरीष महाजन, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, आ. अमरिशभाई पटेल, मा. सरकारसाहेब रावल, नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल, आ. संजय सावकारे, आ. राहुल ढिकले, आ. काशीराम पावरा, आ. सीमा हिरे, आ. राजेश पाडवी, माजी आ. स्मिता वाघ, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, बबन चौध्ररी, सुभाष देवरे, धुळे मनपाचे महापौर प्रदीप कर्पे, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, जयपालसिंग रावल, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्षा कुसुम कामराज निकम, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माधुरी बाफना, शहादयाचे दीपक पाटील, भरत माणिकराव गावीत, विजय चौधरी, महिला बालकल्याण सभापती मंगला पाटील, आरोग्य सभापती धरती देवरे, कृषी सभापती संग्राम पाटील, राम भदाणे, शिंदखेडा पंस सभापती अनिता राकेश पवार, शिंदखेडयाच्या नगराध्यक्षा रजनी अनिल वानखेडे, ॲङ अमरजीत गिरासे, स्वोध्दारक विदयार्थी संस्था सेक्रेटरी सी. एन. राजपूत, प्रवीण महाजन यांच्यासह धुळे, नंदुरबार जिल्हयातील जिल्हा परिषद सदस्य, धुळे नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक, विविध पंचायत समित्यांचे सदस्य, बाजार समित्यांचे संचालक, भाजपाचे पदाधिकारी व हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.