नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथून शिरपूरकडे बुलेटमोटरसायकलने जात असतांना अनरद टेकडीजवळ अचानक बुलेटचा स्फोट होऊन चालक गंभीररीत्या भाजला गेल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजता घडली. गंभीर अवस्थेत त्यास धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या घटनेत बुलेट पूर्णतः जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश तिरमले रा. नितीननगर ,शहादा हे त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या बुलेट मोटरसायकलने शहादा येथून शिरपुरकडे जात होते दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास दोंडाईचा – शिरपूर रोडवरील अनरद टेकडीजवल अचानक धावत्या बुलेटला आग लागून स्फोट झाला.
हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, त्यात काही सेकंदातच प्रकाश तिरमले गंभीररित्या भाजले जाऊन रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.स्फोटाचा आवाज ऐकून रस्त्यालगत व शेतात असलेले घटनास्थळी धावून आले घटनेची माहिती शहरात पोहचताच नातेवाईकांनी तात्काळ धाव घेत रुग्णालयात दाखल केले मात्र गंभीर भाजल्या मुळे पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे.








