शहादा ! प्रतिनिधी
शहरातील अतिक्रमण हटविण्यात भेदभाव केल्यामुळे शहादा शहरातील महालक्ष्मीनगर येथील रहिवासी मंगलाबाई गणेश ठाकरे यांनी संपूर्ण परिवारासह अडीच वर्षांच्या चिमुकला तर तीन महिन्याची चिमुकलीला सोबत घेवून प्रांत कार्यालयाजवळ आमरण उपोषण केले असून शहरात चर्चेचा विषय ठरला आहे . यामुळे नागरिकांकडून प्रशासकीय यंत्रणेविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे .
शहादा येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील प्रांत कार्यालयासमोर मंगलाबाई गणेश ठाकरे या पती गणेश ठाकरे , आशिष ठाकरे , राधिका ठाकरे , कमलेश ठाकरे , प्रियंका ठाकरे , लावण्या कमलेश ठाकरे ( वय २ वर्ष ६ महिने ) व हनी कमलेश ठाकरे ( वय ३ महिने ) यांच्यासह आमरण उपोषणासाठी बसल्या आहेत . प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या अतिक्रमण उठाव मोहिमेत शहरातील मेन रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले होते .
त्यात मंगलाबाई ठाकरे यांच्या पतीची पानटपरीदेखील काढण्यात आली होती . परंतु पानटपरी लगतच असलेले चिराग बेल्ट हाऊस या दुकानाचे अतिक्रमण काढले नसल्याने अतिक्रमण हटवण्यात भेदभाव केल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपविभागीय अधिकारी शहादा , उपविभागीय अधिकारी पाटबंधारे शहादा , मुख्याधिकारी नगर परिषद शहादा , तहसिलदार या अधिकाऱ्यांना अतिक्रमणधारक व्यक्तीबद्दल लेखी स्वरुपात तक्रार करुनदेखील संबंधित अतिक्रमणधारकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.यामुळे चिराग बेल्ट हाऊस या दुकानाचे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे या मागणीसाठी मंगलाबाई गणेश ठाकरे संपूर्ण परिवारसोबत आमरण उपोषणास बसल्या आहेत.उपोषणास शहरातील नागरिकांनी , विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठींबा दिला आहे .