तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतकरी भगवान लोहार व दिनेश लोहार शेतातील सुमारे तीन एकरातील उभ्या असलेल्या पपई पिकाची काठीच्या सहाय्याने एका अज्ञात माथेफिरुने, पपईचे ४०-५० झाडे कापल्याच्या घटनेने शेतकर्यांमध्ये हळहळ निर्माण होऊन घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सदरील घटना अशी की, गुरुवार रोजी शेतातील पिकाला दिवसभर पाणी देण्याचे काम चालू होते. संध्याकाळी ६ च्या सुमारास शेतातील काम आपटून आपापल्या घरी निघून गेल्यावर रात्री व पहाटच्या सुमारास कुणीही शेतात नसल्याच्या अंदाज घेत एका अज्ञात माथेफिरुने, स्वतः जवळ असलेल्या काठीच्या सहाय्याने पिकाची नासधूस करत, ठिबक सिंचनाचे पाईप, व्हेंचुरीची तोडफोड केली. पपईच्या पिकाला अर्ध्यापासून मोडल्याचे शेतकरी यांच्या मार्फत सांगण्यात आले. पाच-सहा महिन्याच्या पपईच्या पिकाची अशा प्रकारे नासधूस झाल्यामुळे, हातातोंडाशी आलेला घास त्या माथेफिरूने हिसकावून घेतल्याने, परिसरात हळहळ निर्माण होऊन, संताप व्यक्त करण्यात येतो आहे. याबाबत माहिती मिळताच तळोदा पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे व कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. दरम्यान अज्ञात माथेफिरू विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरील शेतकर्याने मार्च महिन्यांत पपई पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे सहा महिन्याच्या पपईला बर्यापैकी फळ व फुल्लर आल्याने चांगल्या प्रकारे उत्पन्न निघाले असते. परंतु सदरील शेतकर्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून, हातातोंडाशी आलेला घास गेल्याने सदरील शेतकरी कुटुंब हवालदिल झाले आहे. तसेच ठिबक सिंचनाचे साहित्य, पाईपलाईन, व्हेंचुरी किटची सुद्धा तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अज्ञात माथेफिरूचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेऊन, दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.