तळोदा ! प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या संवांद यात्रेचे नियोजन करण्यासाठी आज सकाळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची तळोदा येथील आमदार कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्विकृत नगरसेवक पदावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. मात्र, आ.राजेश पाडवी यांच्या मध्यस्थीने दोघांमध्ये समेट घडवण्यात आला. त्यामुळे या वादावर पडदा पडला.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची दि. १६ ऑगस्टपासून नाशिक , धुळे व नंदुरबार जिल्ह्यात संवादयात्रा निघणार आहे. सदर संवाद यात्र तळोदा येथेही येणार आहे.या संवादयात्रेच्या नियोजनासाठी तळोदा येथे
शुक्रवारी दि. १३ ऑगस्ट रोजी आमदार कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत भाजप ओबीसी युवासेलचे जिल्हाध्यक्ष जगदिश परदेशी यांनी भाजप जिल्हा चिटणीस हेमलाल मगरे यांचा स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा कधी घेतला जाईल ? असा प्रश्न उपस्थित केला ? यावर प्रतिक्रिया देत हेमलाल मगरे यांनी आक्रमक भाषेत उत्तर दिल्याने वाद वाढल्याचे बोलले जात आहे . यावेळी आ . राजेश पाडवी व नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी या विषयावर आपण नंतर चर्चा करू असे सांगत शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे समजले . यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी , तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी , पं.स.सदस्य विजय राणा , प्रवीणसिंग राजपूत यांनी व उपस्थित पदाधिकारी यांनी मध्यस्थी करत वादाला आवर घालण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी स्विकृत नगरसेवक हेमलाल मगरे यांनी राजीनामा न देण्याबाबत ठाम भूमिका घेतली. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली . परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आ. राजेश पाडवी यांनी मध्यस्थी केल्याने या वादावर पडदा पडला. दरम्यान , या घटनेची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली असून या बाबत जोरदार चर्चा रंगली आहे .
तळोदा येथे तत्कालीन पॅनल प्रमुख व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली२०१७ मध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निकालानंतर पुढील पाच वर्षात नंदुरबार पॅटर्नप्रमाणे निवडणूकीनंतर झालेल्या बैठकीत ज्यांनी उमेदवारी केली नाही अथवा माघार घेतली प्रचारात परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पद फिरते ठेवणार असल्याचे पाडवी यांनी जाहीर केले होते . मात्र कालांतराने त्यावर पहिले दोन वर्षे काहीही हालचाल झाली नाही.यादरम्यान उदेसिंग पाडवी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.नगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून विविध विषय समित्या व स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्विकृत नगरसेवक पदासाठी समाजातील प्रत्येक घटकाला संधी मिळावी म्हणून एका वर्षासाठी निश्चित केले होते. त्यावेळी इच्छुकांनाही आपल्या इच्छेस मुरड घालावी लागली, या सुत्रानुसार माळी समाजातील हेमलाल मगरे यांची वर्णी लागली होती. याबाबत तत्कालीन पदाधिकाऱ्यांनीही मौन पाळून हा मुद्दा रेंगाळत ठेवला आहे.