नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र गुजरात सीमेजवळील चरणमाळ घाटात अपघातांचा डेली शो सुरू आहे. मध्यरात्री कांद्यानी भरलेला ट्रक तीव्र उताराच्या वळणावर पलटी झाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे, तर चालक व सहचालक किरकोळ जखमी झाले आहे.
सदर ट्रक पिंपळनेर हुन नवापूर कडे कांदे घेऊन जात असताना अपघात झाला आहे. कालच या ठिकाणी गुजरात परिवहन महामंडळाची एक बस दरीत कोसळणार होती, परंतु चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जीवित हानी टळली होती.
धुळे नंदुरबार या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या जवळ व महाराष्ट्रातून गुजरात मध्ये जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता म्हणून वाहन चालक याचा वापर करतात परंतु डोंगरदर्याच्या या रस्त्यात चरणमाळ गावाखाली असलेला घाट रस्ता अति तीव्र वळण उताराचा असल्याने मालवाहू वाहने अनियंत्रित होऊन अपघात होतात. सदर घाट रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी जेणेकरून अपघात टाळता येईल अशी मागणी केली जात आहे.
चरणमाळ घाट रस्त्यात अपघात झाल्यानंतर गाडीमधील मालाची लूट व्हायची. ही लूट थांबावी यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, नवापूर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी बैठका घेऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन केल्याने लूट थांबली आहे.
तसेच अपघात होताच ग्राम सुरक्षा दलाच्या वतीने तत्काळ मदत केली जाते. पोलीस विभागाने उपाय योजना केल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील घाट दुरुस्तीकडे उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.