नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील “ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत एक महिन्यात 198 बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना यश आले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2014 पासुन “ऑपरेशन मुस्कान” ही मोहीम दरवर्षी राबविण्यात येते.या मोहिमेअंतर्गत अपहत (पळवून नेलेले) अल्पवयीन मुले, मुली तसेच बेवारस,भिक मागणारे,कचरा गोळा करणारे,समाजाच्या मुख्य प्रवाहापासुन वंचित असणा-या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांकडे किंवा बालसंरक्षण गृहे यांच्या सुपूर्त करण्यात येते.त्यानुसार यावर्षी देखील दि. 1 जून 2022 ते दि. 30 जून 2022 या दरम्यान महाराष्ट्र राज्यासह नंदुरबार जिल्ह्यात “ऑपरेशन मुस्कान 11” राबविण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात “ऑपरेशन मुस्कान – 11″ राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचना देऊन मार्गदर्शन केले.सदर ” ऑपरेशन मुस्कान – 11 साठी जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हयातील बाल संरक्षण गृहे, बालकांसाठी काम करणा-या अशासकीय संस्था व बाल पोलीस पथकातील अधिकारी, कर्मचारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतला,
प्रत्येक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनचे 1 पोलीस अधिकारी व 4 पोलीस अंमलदार यांची पथकात नेमणूक केली. तसेच वरील सर्व घटकातील अधिकारी व कर्मचारी यांची जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात समन्वय बैठक घेवून “ऑपरेशन मुस्कान 11” प्रभावीपणे राबविण्यासाठी रुपरेषा ठरविण्यात आली.संपुर्ण मोहिमेदरम्यान जिल्हयातील वेगवेगळे
रेल्वेस्टेशन,बसस्थानके, धार्मिक स्थळे,हॉटेल्स, ढाबे याठिकाणी काम करणारे बालके,भिक मागणारी बालके तसेच कचरा गोळा करणारी बालके यांचा शोध घेतला.सदर मोहीमेदरम्यान नंदुरबार शहर पोलीस स्टेशन-14 बालके व 5 बालिका, नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन 11 बालके व 1 बालिका,
उपनगर पोलीस स्टेशन-12 बालके व 5 बालिका, विसरवाडी पोलीस स्टेशन 12 बालके व 3 बालिका,नवापुर पोलीस स्टेशन 14 बालके व 4 बालिका,शहादा पोलीस स्टेशन -3 बालके व 3 बालिका,सारंगखेडा पोलीस स्टेशन 12 बालके व 11 बालिका, म्हसावद पोलीस स्टेशन – 20 बालके व 5 बालिका,
धडगाव पोलीस स्टेशन 10 बालके व 1 बालिका,तळोदा पोलीस स्टेशन – 9 बालके व 1 बालिका,अक्कलकुवा पोलीस स्टेशन 14 बालके व 3 बालिका व मोलगी पोलीस स्टेशन -5 बालके व 1 बालिका असे एकूण 141 बालके व 43 बालिका यांचा शोध संपुर्ण मोहिमेदरम्यान घेऊन त्यांच्या समक्ष पालकांना बोलावुन त्यांचे समुपदेशन करून शिक्षणाची व बालहक्कांची माहिती दिली.
तसेच त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले.1 महिन्याचे कालावधीत सदरची कामगिरी करण्यात आलेली आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे असई भगवान धात्रक यांचे नेतृत्वात नेमलेल्या विशेष पथकाने जिल्हयातील सर्व शहरांना भेटी देवून एकुण 14 अल्पवयीन बालकांना शोधून व त्यांना त्यांच्या पालकांचा शोध घेवून त्यांना व संबंधित हॉटेल चालकांना योग्य ती कायदयाची समज दिली.
तसेच पालक नसलेल्या बालकांना बालसंरक्षण गृहात पाठविण्याची दक्षता घेऊन मोलाची कामगिरी बजावली.वरील संपुर्ण मोहिमे दरम्यान एकुण 198 अल्पवयीन बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले.वरील संपुर्ण मोहिम ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्याचे सर्व प्रभारी अधिकारी,
त्यांचे अधिनस्त असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व असई भगवान धात्रक व अंमलदार यांनी यशस्वीपणे राबविली आहे.