नवापूर l प्रतिनिधी
सौंदर्याचे मापदंड मोजता येण्यासारखे नसतात, गोरी कातडी, लांब केस यामध्ये सौंदर्याची व्याख्या बसत नाही. सुंदर दिसण्यासाठी गरज असते ती सुंदर मनाची, याच विचारातून नवापूर येथील पुनम बिऱ्हाडे हिने आपल्या जन्मदिनी केशदान केले.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झगडणाऱ्या रुग्णाचे किमोथेरपीमुळे केस जाऊन टक्कल होते. यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. आजारातून बरे झाल्यानंतरदेखील नवीन केस यायला खूप अवधी लागत असल्याने या रुग्णाचे मानसिक खच्चीकरण होते.
हे थांबवण्यासाठी देशभरात अनेक संस्था,अनेक कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट विग तयार करून मोफत स्वरूपात या रुग्णांना पुरवतात. त्यासाठी त्यांना केशदान करणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते. आपण समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत
आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतूनच सामाजिक कार्यकर्त्या पुनम दामु बिऱ्हाडे यांनी मुंबई येथील “Cope with cancer” संस्थेला आपले केस दान दिले. कापलेले केस कुठल्याही मोबदल्याशिवाय या संस्थेला पाठविले आहेत. आपल्या केसांचा वापर करून बनवलेल्या विगमुळे कोणाच्यातरी चेहऱ्यावर आनंद पसरेल ही समाधानाची गोष्ट आहे.
यासाठी पूनम यांना त्यांचे वडील दामु वना बिऱ्हाडे यांच्याकडून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले . पुनम ह्या एकल महिलांसाठी काम करीत असून त्यांनी याआधी वैद्यकीय महविद्यालयाला मरणोत्तर देहदान सुध्दा केले आहे. त्यांच्या ह्या साहसी आणि इतरांना प्रेरणा देणाऱ्या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे.
जाणिवेतून घेतला निर्णय
सामाजिक क्षेत्रा मध्ये काम करीत असताना कॅन्सरमुळे आत्मविश्वास गमावलेल्या अनेक व्यक्तींना भेटले त्यांचे दुःख जाणून घेतले तसेच त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या सौंदर्याचा तर केस म्हणजे अविभाज्य भाग आहे. दुर्धर आजाराशी लढा आणि त्यात आपल्या सौंदर्याची वाताहात होताना बघणं हे आत्मविश्वास डळमळीत करणार आहे. याची जाणीव होऊन मी स्वेच्छेने कॅन्सर रिसर्च संस्थेला आपले केस दान केले.
– पुनम बिऱ्हाडे, सामाजीक कार्यकर्ता