नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील महिलेने कोर्टाचे बनावट आदेश तयार करून शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून २ लाख ५० हजार रुपये परस्पर काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत मुलीचे ठेवलेले २ लाख ५० हजार रुपये काढण्यासाठी हिना विशाल वळवाके रा.लक्कडकोट, ता.शहादा,हमु.सनसिटी, नवापूर रोड, नंदुरबार यांनी तळोदा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायीक अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी करुन बनावट कार्यालयीन आदेश तयार करून नंदुरबार स्टेट बँक शाखेतून सदर रक्कम परस्पर काढून फसवणूक केली.
सदर घटना दि.३ जुन रोजी सकाळी ११ वाजता घडली.याप्रकरणी तळोदा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहायक अधीक्षक चुनिलाल आत्माराम महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिना विशाल वळवाके यांच्या विरूध्द
तळोद पोलिस ठाण्यात भादवि कलम ४१९,४२०,४६५, ४६७,४६८,४७१,४७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी तपास सपोनि अमितकुमार बागुल करीत आहेत.