चिनोदा । प्रतिनिधी
चिनोदा : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात कृषि दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रविण वसावे यांच्या हस्ते शेती औजारांचे पूजन करून कृषि दिनानिमित्त विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नंदुरबार कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत रोहन गांगुर्डे यांनी कृषि दिनाविषयी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त १ जुलै हा दिवस कृषि दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्रात हरित क्रांती घडविण्यात वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता. कृषि क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्म दिवस आपण ‘कृषि दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो असे सांगितले.
या कार्यक्रमाला प्राचार्य प्रविण वसावे, प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदींसह नंदुरबार येथील कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत रोहन गांगुर्डे, आदित्य आंधळे, ओंकार भोईर, जितेंद्रकुमार यादव, गणेश बारेला आदी उपस्थित होते.