नंदुरबार l प्रतिनिधी
स्वच्छता प्रचार,प्रसार व सार्वजनिक पातळीवर सक्रियता राखल्याने येथील श्राॅफ हायस्कूलला ‘ स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी ‘ शासनाचे राज्यस्तरावरील मानांकन मिळाले आहे.शिक्षण विभागामार्फत मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले.
परिसरासह स्वयंस्वच्छता बाबत शासन जागरूक असून बालमनावर संस्कार गोंदवता यावे म्हणून स्वच्छते विषयक कृती उपक्रम राबविण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमात सक्रियता दाखविणाऱ्या शाळांसाठी केंद्र शासनाने स्वच्छ विद्यालय पुरस्कार केंद्रीय पातळीपर्यंत देण्याचे जाहीर केले आहे. याच पुरस्कारासाठी श्राॅफ हायस्कूलची निवड राज्यस्तरावर करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय पुरस्काराचे विविध निकष पूर्ण केल्याबद्दल पंचतारांकित दर्जासह 92 गुणांचे मानांकन असलेले शासनाचे प्रमाणपत्र नुकतेच जिल्हा शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, सतीश चौधरी,समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर,उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी शाळेच्या मुख्याध्यापक सौ. सुषमा शाह यांना प्रदान केले.
नागरी वस्तीत जाऊन स्वच्छतेचा प्रचार प्रसार करणे,तेथला परिसर विद्यार्थ्यांद्वारे स्वतः स्वच्छ करणे,शालेय परिसरात जल व्यवस्था,पाणी स्वच्छता, सुलभ प्रसाधन व्यवस्था,विद्यार्थ्यांची स्वयं स्वच्छता आदी निकषांवर हे प्रमाणपत्र देण्यात आले.
राज्यस्तरावर श्रॉफ हायस्कूलची निवड पुरस्कारासाठी होणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. उपमुख्याध्यापक राजेश शहा, पर्यवेक्षक सौ. विद्या सिसोदिया, जगदीश पाटील व सर्व शालेय परिवाराने या पुरस्कारासाठी सक्रियता दाखविल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.