चिनोदा l प्रतिनिधी
प्रति पंढरपूर म्हणुन ओळख असलेल्या तळोदा तालुक्यातील रांझणी येथील श्री विठ्ठल मंदिराची रंगरंगोटी व दर्शन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे .
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळोदा तालुक्यातील रांझणी येथील श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात दरवर्षी देवशयनी आषाढी एकादशी निमित्त दर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र मागील दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले होते.
त्यामुळे सदर दर्शन सोहळा रद्द करण्यात आला होता. यावर्षी कोरोनाचे सावट व निर्बंध हटवल्याने भक्तगण हे मंदिरात मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतील त्यामुळे श्री विठ्ठल रुखमाई मंदिर सेवा समिती तर्फे दर्शन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराची रंगरंगोटी सजावट काम व परिसराच्या सजावटीच्या कामाला प्रारंभ करुन दर्शन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.
दर्शन सोहळ्या दरम्यान मंदिर परिसरात पाळणे, विविध साहित्याची दुकान थाटत असतात व परिसरातील भाविक पायी, पालखी दिंडीने येतात. यामुळे गावात यात्रेचे स्वरूप येत असते. कोरोनाच्या दोन वर्षांच्या सावटा नंतर प्रथमच श्री विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार असल्याने भाविकामध्ये चैतन्याचे वातावरण आहे.