नंदुरबार | प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील गोरंबा पाटीलपाडा येथे खराब रस्त्यामुळे प्रवासी प्रवासी वाहन ५० फूट खोल दरीत पडून झालेल्या अपघातात १ जण जागीच ठार तर ६ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोरंबा पाटीलपाडा येथे खराब रस्त्यामुळे प्रवासी वाहन उतारावरून घसरून थेट ५० फूट खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे.
या अपघातात मानसिंग वळवी (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले आहे. जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून चार जण गंभीर जखमी आहे. सर्व प्रवासी सेगलापाडा येथील रहिवासी होते.

सदर वाहन किर्ता कागडा रहासे यांचे असून गोरंबाच्या सेगलापाडा येथील प्रवाशांना शहादा येथे बाजारासाठी घेऊन आले होते, घरी परत जात असताना गोरंबा पाटीलपाडा जवळ हलक्या पावसाच्या सरी कोसळत असताना तीव्र उतारावरून प्रवासी वाहन घसरल्याने थेट ५० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. सदर रस्त्यावर अद्यापही शासनाकडून डांबरीकरण रस्त्याचे काम केलेले नाही.
स्थानिक नागरिकांकडून माती टाकून कच्चा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर पाड्याला जोडणार्या रस्त्यांचे काम तात्काळ करावी अशी मागणी नागरिकांद्वारे केली जात आहे.
सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव अक्कलकुवा तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या नावाने तयार होणार्या रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. डोंगरदर्यातील चढ-उतार खडतर रस्त्यांमुळे बस सुविधा नसल्याने या भागातील नागरिकांना खाजगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
वर्षानुवर्षे खराब रस्त्यांमुळे वारंवार दरीमध्ये प्रवासी वाहने पडुन अपघातांचे सत्र सुरूच आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यावर ठोस उपाय योजना करण्यास तयार नाही.
ग्रुप ग्रामपंचायत गोरंबा मुख्य पाड्याला जोडणार्या रस्त्याचे डांबरीकरण काम २००८ साली करण्यात आले होते. गेल्या १४ वर्षानंतर या रस्त्यावर कोणतीही दुरुस्ती किंवा नवीन रस्ता तयार करण्यात आलेला नाही.
त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वारंवार अपघात घडत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.








