शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील उंटावद येथील बारा वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून बलात्कार व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका संशयिताला शहादा पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता 17 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील उंटावद येथील प्रभूदत्तनगरमध्ये राहणारा संशयित हेमंत उर्फ गोलू रमण ठाकरे याने दि.7 जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बारा वर्ष सात महिने वयाच्या विद्यार्थिनीला वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून लग्नाचे आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. पीडित अल्पवयीन बालिकेला हेमंत ठाकरे याने शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथे त्याच्या नातेवाईकाच्या घरी नेऊन त्या ठिकाणी बलात्कार व अनैसर्गिक कृत्य करून लैंगिक छळ केला.
याबाबत शहादा पोलिसात संशयित हेमंत रमण ठाकरे याच्याविरोधात अपहरण बलात्कार व लैंगिक अपराधापासून बालकांचे सरक्षण अधिनियम आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी संबंधित आरोपीस मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास जितेंद्र महाजन करीत आहेत.
दरम्यान, या घटनेतील पीडित मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. अशा वेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक राहुल जगताप व समुपदेशक अर्चना गावित यांनी पीडित बालिकेचे समुपदेशन करून तिला घडलेल्या घटनेबाबत बोलते केले. त्यानंतर पीडित बालिकेने तिच्यावर घडलेली आपबीती सांगितल्याने व घरच्या लोकांशी संवाद साधल्यानंतर सदर गुन्हा दाखल झाला.








