शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय व कृषी महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहाचे आयोजन दि. ७ जून ते १३ जून दरम्यान करण्यात आले होते.
महाविद्यालय परिसर, वैद्यकीय दवाखाना, पांडव/जैन लेणी, गोमाई नदी पात्र, लोणखेडा चार रस्ता परिसर इ. ठिकाणी स्वच्छता अभियान सोबतच पाणी अडवा-पाणी जिरवा, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व संवर्धन इ. विषयांवर पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
विशेष म्हणजे एक हजार आंब्यांच्या कोईचे बीजारोपण आणि चिंच, जांभूळ, गुलमोहर, सीताफळ, कडुलिंब इ. झाडांच्या बियापासून बनविलेले ३०० सीड बॉल्सचे वाटप करण्यात आले. सप्ताहाचा समारोप माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण संरक्षण व संवर्धन विषयी शपथ घेऊन आणि प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने करण्यात आला.
समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, प्राचार्य डॉ. पी.एल.पटेल, प्रा.डॉ. आर. एम. चौधरी, प्रा. डॉ. पी.पी. जगताप प्रा. ए. बी.पाटील, प्रा.आर.व्ही.पाटील, प्रा. पी.जी. चांडीले, प्रा. मोहन चितोड आदी उपस्थित होते.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांनी अभिनंदन केले.
सप्ताहाच्या उपक्रमांचे नियोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. पंकज पेंढारकर, प्रा. राजेंद्र पाटील, प्रा.डॉ. वजीह अशहर, प्रा. डॉ. वर्षा चौधरी यांनी केले. सप्ताहाच्या सर्व उपक्रमांच्या आयोजनासंबंधी रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.








