शहादा l प्रतिनिधी
शहादा खेतिया रस्त्यावर श्री विष्णूपुरम मंदिरासमोर मारुती स्विफ्ट गाडीचा टायर अचानक फुटल्याने ती समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली या अपघातात धडगाव येथील एस. व्ही. ठक्कर ज्युनिअर कॉलेजच्या पहिल्याच दिवशी एका ४५ वर्षीय शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित चार शिक्षकांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमी शिक्षकांना शहादा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.15 जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास धडगाव येथील एस व्हि ठक्कर ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक शितल राणे , शरद चंद्रसिंग पाटील, नरेंद्र दादूसिंग गिरासे, रुपेश मधुकर पाटील व शांतीलाल बुधा सूर्यवंशी हे कॉलेज संपल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहाद्याकडे मारुती स्विफ्ट कार (क्र. एम.एच.३९- एबी- ०९१८) हिच्याने येत असताना शहादा खेतिया रस्त्यावरील दरा फाट्याजवळील श्री नारायण पुरम मंदिरा जवळ या कारचा टायर फुटल्याने सदर गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून रस्त्याच्या खाली १० ते १५ फूट अंतरावर जाऊन पडली. अपघात इतका भीषण होता की सदर गाडी रस्त्याच्या खाली पडताना चार ते पाच वेळा उलटल्याने यातील सर्व सहकारी शिक्षक हे दाबले गेले यात शांतीलाल बुधा सूर्यवंशी हे जागीच ठार झाले असून उर्वरित चौघांना छातीला मानेला डोक्याला व हाताला गंभीर दुखापती झाल्या आहेत.
सदर अपघात घडल्यानंतर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहना जवळ जाऊन त्यातील जखमी शिक्षकांना गाडीच्या बाहेर काढून उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पी.एस.आय. जितेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.
अपघाताची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली प्रत्येकाला महिती मिळताच जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयात नातेवाईकांनी व धडगाव सह तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
शहादा पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्यात येत होती मयत शिक्षक शांतीलाल सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवचिकित्सा केल्यानंतर सायंकाळी उशिरा पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर शहादा येथील अमरधाम येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.