नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा सिपानापाडा येथे चुलत भावाच्या लग्नाला आल्याच्या रागातून पतीने पत्नीला हाताबुक्यांनी बेदम मारहाण करुन जिवेठार मारल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा सिपानपाडा येथे गणेश पुन्या पावरा यांच्या चुलतभावाचे लग्न होते. सदर लग्नास गणेश पुन्या पावरा याची पत्नी बायसीबाई पावरा व गणेश मोजा पावरा हे लग्नासाठी आले होते.
यावेळी गणेश पुन्या पावरा याने पत्नी बायसीबाई गणेश पावरा, गणेश मोजा पावरा यांना तुम्ही माझ्या चुलत भावाच्या लग्नात का आले? या कारणावरुन जिवेठार मारण्याची धमकी दिली.
तसेच पत्नी बायसीबाई पावरा हिला हाताबुक्यांनी मारहाण केली व काठीने बेदम मारहाण करीत जिवेठार केले. याबाबत गणेश मोजा पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात पती गणेश पुन्या पावरा याच्याविरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल भदाणे करीत आहेत.