खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे स्थानिक गुन्हे शाखेकडून धडक कारवाई करण्यात आली.बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाला लगत येथील ओम शांती गुरू किराणा दुकानात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून पान मसाला व तंबाखू जप्त केला. १ लाख ८१ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यात पान मसाला व तंबाखू विक्रीवर प्रतिबंध असतांना खापर येथील ओम शांती किराणा दुकानात विमल पान मसाला व तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथे छापा टाकण्यात आला.कारवाई दरम्यान माल बाळगणे व विक्री प्रकरणी आशिष रमेशचंद जैन व दलपतसिंग लालसिंग राजपुरोहित दोघे रा.खापर ता.अक्कलकुवा यांच्यावर भादवी कलम ३२८,१८८,२७३ प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार पोलीस नाईक मनोज सुदाम नाईक यांच्या फिर्यादी वरून अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि राजेश गावीत करीत आहे.
बातमी मिळाल्यावरच छापा टाकतो.- स्थानिक गुन्हे शाखा
अक्कलकुवा तालुक्यात पानटपरी व किराणा दुकानांवर विमल पान मसाला व तंबाखू सहजचं मिळते.गुजरात राज्यातून रात्रीच्या अंधारात विमल,पानमसाला व तंबाखूची तालुक्यात तस्करी होते.व संबंधित विभागाच्या आशिर्वादाने विक्रीसाठी मलिदा घेऊन सूट मिळत असल्याचे सांगितले जात आहे.अक्कलकुवासह खापर येथे अनेक ठिकाणी विक्री होत असतांना स्थानिक गुन्हे शाखेने मात्र एकाच ठिकाणी छापा टाकल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.बातमी मिळाल्यावरच छापा टाकतो अशी भूमिका स्थानिक गुन्हे शाखेची असेन तर विभाग मात्र इतरांनी दिलेल्या बातम्यावरचं अवलंबून आहे का ? मग कर्मचारी कश्यासाठी? असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहे.स्थानिक गुन्हे शाखा तालुक्यात इतर ठिकाणी छापा टाकुन कारवाई कधी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.