नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणाहून तसेच ग्रामीण भागातून वैद्यकीय सुविधेसाठी बहुतांशी नागरिकांना जिल्हा रुग्णालयात यावे लागते . मात्र नंदुरबार बस स्थानकावरून सुटणाऱ्या व साक्रीकडे मार्गस्थ होणाऱ्या बसेसला जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी थांबा नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती .
याचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना बसत होता . दरम्यान , नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा प्रवासी थांबा मिळावा अशी मागणी दिव्यांग प्रहार क्रांती संस्थेने केली होती . सदर मागणीला यश मिळाले असून साक्रीकडे जाणाऱ्या बसेस आता जिल्हा रुग्णालयाचा ठिकाणी थांबणार आहेत , त्यामुळे दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .
जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी जिल्हा रुग्णालयात यावे लागते . विशेषतः तळोदा , अक्कलकुवा , धडगाव यासारख्या आदिवासी बहुल तालुक्यातील रुग्णांना तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना नंदुरबार बस स्थानकावर उतरल्यानंतर जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नसल्याने खाजगी वाहन अथवा प्रवासी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो .
विशेष म्हणजे बसस्थानकापासून जिल्हा रुग्णालय हे बऱ्याच अंतरावर असल्याने , रिक्षाभाडे देखील दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक व सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न परवडणारे असे आहे .
ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेऊन दिव्यांगाच्या हितासाठी कार्यरत असलेल्या नंदुरबार जिल्हा दिव्यांग प्रहार क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा तालुकाध्यक्ष मंगलचंद जैन , सुनील हिवरे , शरद सागर , सचिन लोहार , महिलाध्यक्षा रशिला बेन , अनिता खर्डे , योगिता जोहरे आदींनी विभाग नियंत्रक एस . टी . महामंडळ धुळे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन ,
नंदुरबार बस स्थानकावरून साक्रीकडे जाणाऱ्या बसेसला जिल्हा रुग्णालय जवळ थांबा द्यावा अशी मागणी केली होती . सदर मागणीची तात्काळ दखल घेऊन नंदुरबार – साक्री बसला नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा थांबा मंजूर करण्यात आला आहे . नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याने जिल्हातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .