नंदूरबार l प्रतिनिधी
विवाहाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्षे पेक्षा कमी असेल तर असा विवाह बालविवाह ठरतो.विवाहाच्या वेळी वयाची अट पुर्ण केल्याशिवाय जर कोणी असा विवाह करत असेल तर तो कायद्याने गुन्हा होत असतो.
असे बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 मध्ये स्पष्ट नमुद्र करण्यात आले आहे.दि. 2 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी,नंदुरबार यांच्या कार्यालयात शिवाजी वळवी मु. गदवाणी पो.जमाना ता. अक्ककुवा व सुखदेव वळवी मु.पो.खुंटामोडी ता.धडगांव यांनी गदवाणो पो.जमाना ता. अक्कलकुवा येथील
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या इच्छेविरुद्ध दि. 3 जून 2022 रोजी काकरपाडाचा पाटीलपाडा ता.धडगांव येथील एका तरुणाशी विवाह होणार असून विवाहाचे वेळी मुलीचे वय कायद्याने कमी आहे असा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता.
सदर घटनेची माहिती जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या कार्यालयाकडून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांना कळविण्यात आली.
सदरची तक्रार ही अत्यंत गंभीर होती त्यामुळे त्यांनी तात्काळ मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक धनराज निळे यांना प्रकरणाचे गांभीर्य सांगून संबंधीतांच्या भेटी घेवून तातडीने सदरचा विवाह थांबविण्याबाबत आदेशीत केले.
प्राप्त माहितीच्या आधारे सहा. पोलीस निरीक्षक मालगी पोलीस ठाणे धनराज निळे यांनी मुलाचे वडील शांताराम मुंगा वसावे रा. काकरपाडाचा पाटीलपाडा व मुलीचे वडील रायसिंग वेस्ता पाडवी रा.गदवाणीचा कारभारीपाडा ता. अक्कलकुवा यांना तात्काळ मोलगी पोलीस ठाणे येथे बोलाविले.
प्रभारी अधिकारी निळे यांनी दोन्ही पक्षाकडील लोकांना व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना मुलीचे वय 17 वर्षे असून ती अल्पवयीन आहे.तसेच कायद्याने मुलीचे लग्नाचे वय 18 वर्ष निश्चीत केले आहे. त्यामुळे आपण जर मुलीचे लग्न केले तर तो कायद्यानुसार गुन्हा ठरेल.
त्याचप्रमाणे 18 वर्षे वयापेक्षा कमी वयात मुलींचे विवाह झाल्यास त्याचा परिणाम मुलीच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होतो.कमी वयात मुलींचे विवाह झाल्यास जन्माला येणाऱ्या अपत्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो असे समजावून सांगितले,
दोन्ही पक्षाकडील लोकांनी मुलांचे वय हे 17 वर्ष असून ती अल्पवयीन असल्याचे मान्य केले.तसेच ज्या दिवशी मुलीचे वय 18 वर्ष पुर्ण होईल त्यादिवशी ठरल्याप्रमाणे मुलीचा विवाह नियोजीत मुलासोबत लावून देण्यात येईल असे लेखी जबाब तसेच हमीपत्र लिहून दिले.
त्यामुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबविण्यात नंदुरबार जिल्ह्यातील पोलीसांना यश आल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पालकांनी मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष पुर्ण झाल्यावर त्यांचे विवाह करावे.तसेच अशा प्रकारचे बालविवाह नंदुरबार जिल्ह्यात कोटे होत असल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्याला किया नियंत्रणकक्ष,नंदुरबार येथे कळवावी.असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केले आहे.








