नंदूरबार l प्रतिनिधी
खंडणी मागणारी महिला , तिची महिला साथीदार व दोन आरोपीतांविरुद् आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून. शहादा, नंदूरबार व आता नंदूरबार उपनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्लील व्हिडीओ कॉल करुन तसेच ते रेकॉर्ड केल्याचे भासवून पिडीत व्यक्तींना बदनाम करण्याची धमकी देवून त्यांचेकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे दि.31 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता . अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ कॉल करुन व पिडीत व्यक्तींना बदनाम करण्याची भिती दाखवून त्यांचेकडून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या नागरिकांसोबत झाले असतील अशा नागरिकांनी कसलीही भिती न बाळगता समोर येवून पोलीस ठाण्याला तक्रार द्यावी .
तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील व इतर राज्यातील नागरिकांना केले होते .पोलीस अधीक्षक नंदुरबार पी . आर . पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नंदुरबार शहरातील एका 41 वर्षीय बांधकाम व्यावसायीकाने सदर महिला व तिच्या दोन महिला साथीदार व तथाकथीत पत्रकाराविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीन्वये आणखी एक गुन्हा झाला होता .
तसेच आज दि. 3 जून रोजी गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील निझर येथील एका 67 वर्षीय पिडीत व्यक्तीने पोलीस अधीक्षक कार्यालय , नंदुरबार येथे येवून पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या समक्ष त्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार सांगितला .
पिडीत व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकुन घेवून पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो प्रसारीत करण्याची भिती दाखवून पिडीत व्यक्ती यांना धमकी देवून त्यांचेकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीविरुद् कठोर कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते .
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत सदर अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करणारी महिला , तिची साथीदार महिला , संशयित आरोपी गोविंदा व बॉबी यांनी सुमारे दोन ते अडीच महिन्यापुर्वी तक्रारदार यांचा अश्लील व्हिडीओ तयार केला होता .
तो अश्लील व्हिडीओ तक्रारदार यांच्या नातेवाईकांना व सोशल मिडीयावर प्रसारीत करण्याची धमकी देवून त्यांचेकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागीतली होती . तसेच खंडणीचे पैसे देत नाही तो पर्यंत त्यांनी तक्रारदार यांना सदर महिलेच्या घरात डांबून ठेवले होते व खंडणीचे 10 लाख रुपयांपैकी 30 हजार रुपये घेतल्यावर त्यांची सुटका केली होती .
सदरची रक्कम स्वीकारल्यावरही पिडीत व्यक्तीचा बनविलेला अश्लील व्हिडिओ व फोटो हे निझर येथील त्यांचे नातेवाईक व गावातील व्हॉट्सअपवर प्रसारीत केले . त्यामुळे तक्रारदार हे व्यथीत झाले . तसेच ते त्यांचे राहते घर व गांव सोडून परजिल्ह्यात निघून गेले होते .
तक्रारदार यांना सदर महिलेविरुध्द गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते आज दि. 3 जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे आले असता त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उपनगर पोलीस ठाणे भा.द.वि. कलम 384 , 385 , 342 , 323 , 504 , 506 , 120 ( ब ) , 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 , 67 ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नंदुरबार तसेच इतर राज्यातील नागरीकांना पुन्हा आवाहन करण्यात येते की , अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ कॉल करुन व बदनामी करण्याची भिती दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या नागरिकांसोबत झाले असतील अशा नागरिकांनी कसलीही भिती न बाळगता समोर येवून पोलीस ठाण्याला तक्रार द्यावी . तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.