नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथे १२५ क्षमतेचे मुलामुलींसाठी स्वतंत्र दोन वस्तीगृह सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
आमश्या पाडवी यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असून यातील आदिवासी मुलां-मुलींच्या शिक्षणाकरिता राज्यात विविध ठिकाणी आदिवासी विकास विभागामार्फत मुला-मुलींचे वसतिगृह चालविले जातात तेथे राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊन आदिवासी मुलां-मुलींना उच्च शिक्षण घेता येते.
अक्कलकुवा तालुक्यात खापर, वाण्याविहीर, मोलगी व अक्कलकुवा हया तालुक्याच्या ठिकाणी १९७७ पासून ७५ मुलांच्या क्षमतेचे वस्तीगृह चालू आहे. तळोदा येथे मुलांचे तीन व मुलींचे दोन वसतिगृह कार्यान्वित आहेत. तेथे फक्त कला विज्ञान वाणिज्य व समाजकार्य महाविद्यालये आहेत.
तर अक्कलकुवा येथे विविध डिप्लोमा, इंजिनिअरिंग, विधी,(एल.एल.बी) औषध निर्माण शास्त्र, दोन शिक्षणशास्त्र महाविद्यालये दोन डी.एड तसेच कला, विज्ञान, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालये व ४ कनिष्ठ महाविद्यालये कार्यान्वित आहेत.
वरील प्रमाणे शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर आदिवासी मुले-मुली वरील अभ्यास क्रमांना प्रवेश घेतात परंतु वसतिगृहाची क्षमता अत्यंत तोडकी असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक तसेच शैक्षणिक तणावाला सामोरे जावे लागते व मध्येच निवास व भोजन व्यवस्था नसल्याने शिक्षण सोडावे लागते.
गेल्या ४४/४५ वर्षात तालुक्याचा संपूर्ण चेहरा बदललेला आहे. शिक्षणाचा सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. परंतु आदिवासी दुर्गम भागातील मुला-मुलींना या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या निवास व भोजनासाठी वसतिगृह अत्यंत आवश्यक आहेत जेणेकरून दुर्गम भागातील आदिवासी मुला-मुलींची गुणवत्ता जगासमोर येईल.व ते मुख्य प्रवाहात येऊन जगाशी स्पर्धा करतील.
आता युद्ध पातळीवर मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र १२५ क्षमतेचे वसतिगृह ताल्काळ मंजूर करून शिक्षणाच्या प्रवाहात येऊ पाहणाऱ्या दुर्गम भागातील मुला-मुलींना न्याय द्यावा व त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी शेवटी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी केली आहे.यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविंद्र गुरव, युवा सेना जिल्हाधिकारी ललित जाट, तालुका प्रमुख मगन वसावे, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी आदि उपस्थित होते.