खापर l वार्ताहर
अक्कलकुवा तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे गलथान कारभार असल्याचे नेहमी निदर्शनास येते.या विभागाचे अभियंता अक्कलकुवा येथील कार्यालयात नसून तर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय शहादा येथूनच काम बघतात.
त्यामुळे येथील कार्यलयातील ‘खुर्ची नेहमीच खालीच’ दिसते. संबंधित कामासाठी आलेल्या लोकांना येथील कर्मचाऱ्यांकडून “साहेब शहाद्याला आहेत” असे उत्तर मिळते.त्यामुळे काही काम असल्यास फोनवर संपर्क साधावा लागतो.अभियंता कुणाल पटले यांच्या या कारभाराला तालुक्यातील लोक कंटाळले असल्याचे सांगितले जात आहे.
सद्या बदल्यांचे शिबिर सुरू आहे त्यामुळे आता येथील अभियंतांची बदली होऊन इतर कोणी येत की मग अक्कलकुवा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची परिस्थिती “जैसे थे” राहील याकडे तालुक्याचे लक्ष लागुण आहे.
अक्कलकुवा तालुक्याची तळोदा ते गुजरात राज्यच्या हद्दीपर्यंत नेत्रंग-शेवाळी महामार्गावर येणाऱ्या प्रत्येक पुलावरती कठड्याची आवश्यकता आहे.जुन्या पुलांवरती निकृष्ट दर्जाचे थातुरमातुर काम झालेले असल्यामुळे ते कठडे लवकर तुटतात. व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर विभागाअंतर्गत होणाऱ्या रस्त्यांची परिस्थिती पण तशीच आहे. वर्षपूर्ती होण्यापूर्वीच रस्त्यांना खड्डे पडायला सुरुवात होते.अक्कलकुवा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता त्यांचे काम उपविभागीय कार्यालय शहादा येथुन बघत असल्याने कार्यालयांतर्गत होणारे काम हे राम भरोसेच असल्याचे समजते.गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील कामे अश्याच पध्दतीने सुरू असल्याने तालुक्याचा विकासाला आळा बसत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
विश्रामगृहाचा सार्वजनिक मुतारी म्हणून होतोय वापर
खापर येथील शासकीय विश्राम गृह गेल्या काही वर्षांपासून निकामी.अक्कलकुवा तालुक्यातील खापर हे गाव नेत्रंग शेवाळी महामार्गालगत आहे.दशकांपूर्वी येथील शासकीय विश्राम गृह आकर्षणाचे केंद्र होते.
विश्राम गृहाच्या परिसरात असलेली झाडांची हिरवळ मन मोहणारी होती.कालांतराने संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने विश्राम गृहाची दुरावस्था झाली आहे.प्रवेशद्वार तुटले आहे.
आत असलेले पलंग,कपाट,दरवाजे, खिडक्या देखील पावसाळ्यातील पाण्यामुळे खराब झाले आहेत.परिसरातील दुकानदार विश्रामगृहाच्या प्रागणाला सार्वजनिक मुतारी म्हणून वापरात घेत आहे.विभागाने सदर विषयांची दखल घेऊन विश्रामगृहांचे संवर्धनाची कामे करावी जेणे करून ते वापरात येईल.