नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात लघुशंका करण्याचा वादातून दोन गटांनी एकमेकांवर दगड विटा व काचेच्या बाटल्या फेकल्या. यावेळी पोलीसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी यावेळी तीन आश्रुधूराच्या नळकांडया फोडल्या. याप्रकरणी दोन्ही गटातील ३३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून ६ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिस्मील्ला चौक येथे काल दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास एका घराजवळ एक इसम लघुशंका करीत असतांना एकाने त्याला हटकले. त्यावरून वाद झाला. पाहता पाहता त्या वादाने दंगलीचे रौद्ररूप धारण केले. दोन्हीकडून दगड, विटा, बाटल्यांचा पाऊस सुरू झाला. सदर धुमचक्री तासभर चालली. यावेळी त्याठिकाणी पोलीसदल दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला असता. पोलीसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलीसांनी तीन आश्रुधुराचा नळकांडया फोडल्या. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. बिस्मील्ला चौकात गैरकायद्याची मंडळी जमवून एकमेकांवर दगडफेक करून जमाव पांगविण्यासाठी पोलीस त्याठिकाणी पोहोचले असता पोलीसांच्या गाडीवर दगडफेक व विटांचे तुकडे मारून फेकले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला व जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून याप्रकरणी पो.कॉ. इम्रान खाटीक यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आबीद शेख साफीद शेख, दानीश शेख आजम, साजीद शेख सलीम मेहतर, अंबालाल ठाकरे, विपुल कासारे, डेबु राजेश ठाकरे, गोविंद सामुद्रे, गोपी सामुद्रे, सुखलाल ठाकरे, बॉबी, दिनेश वळवी, दिपक ठाकरे, सचिन ठाकरे, मुकेश ठाकरे, जिवला वळवी, बनकर वळवी, अक्षय अनिल वळवी, सुरेश बाल्या ठाकरे, सुभाष पाडवी, शंकर ठाकरे, साजीद शेख सलीम आमीन पारू कुरेशी, बल्या पारू कुरेशी, मोसीन उर्फ चिंधी अर्शद शेख, फिरूज युसूफ शेख, सलिम शेख, लतिफ शेख, नईम साबीर कुरेशी, फारूक बाबु कुरेशी, शाहरूखक बाबु कुरेशी, सरफराज रहिम बेलदार, सलमान खान जमाल खान पठाण, अरूण बाबुलाल बेलदार, गुलाब नबी अब्दुल्ला पठाण, ईम्रान भिकन कुरेशी, कालू पैलवान कुरेशी, बबलू काल्या आलम कालू कुरेशी या ३३ जणांविरूध्द भादंवि कलम ३५३, ३३६, ३३७, १४३, २४५, १४७, १४९, २६८, २६९, २९०, ४२७ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (अ) (३) चे उल्लंघन १३५ व १४० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी संशयीतांविरूध्द धरपकड सुरू केली असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास एपीआय दिगंबर शिंपी करीत आहेत.सध्या शहरात शांतता असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.