म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणेसह उर्वरित सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने नुकत्याच होणाऱ्या प्रशासकीय व विनंती बदल्यांमध्ये ह्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या याबाबतचे निवेदन सर्वानुमते उपसभापती वैशाली पाटील व मंदाणे गणाच्या पंचायत समिती सदस्या रोहिणी पवार यांनी गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना पंचायत समितीच्या मासिक सभेवेळी दिले.
सविस्तर असे कि,शहादा तालुक्यात मंदाणेसह १४ प्राथमिक केंद्र असून त्यातील कार्यक्षेत्रात ६३ आरोग्य उपकेंद्र आहेत.या आरोग्य केंद्रानंतर्गत साडे तीन लाखा पर्यंत लोकसंख्या जोडली गेली असून जवळपास बहुतांशी गावे ही आदिवासी बहुल वस्तीचे आहेत.
या आरोग्य केंदांमध्ये रोजच शेकडोंच्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी येतात.त्यातच गरोदर माता प्रसूती,अपघात,कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण,इतर दैनंदिन लसीकरण,विविध प्रकारचे आरोग्य शिबिरे सततचे सूरू असतात.
त्यातच काही कर्मचा-यांना रोजचे ऑनलाईन कामे करावी लागतात.त्यामुळे रोजच्या कामांसह वरील कामांचा अतिरिक्त भार हा कमी असलेल्या कर्मचाऱ्यांवर येत असतो.त्यामुळे बऱ्याचदा रुग्णांना गैरसोईना तोंड देण्यासोबतच संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गात तसेच रुग्णांमध्ये तू-तू,मै-मै होतांना दिसून येते.
अनेक वर्षापासून अत्यावश्यक पदे रिक्त असून त्यात औषध निर्माण अधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,प्रयोगशाळा वैज्ञानिक,आरोग्य सहायिका, परिचर आदी पदांचा समावेश दिसून येतो.
अनेक आरोग्य केंद्रांमध्ये जागा रिक्त असल्याने अपूर्ण कर्मचारी वर्गामुळे रुग्णांना आरोग्यसेवा देण्यास कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.त्याचा त्रास रुग्णांनाही भोगावा लागत आहे.
एकंदरीत वरील सर्व परिस्थितीचा विचार करता नुकत्याच होणाऱ्या प्रशासकीय व विनंती बदल्यांमध्ये या जागा त्वरित भरव्यात यासाठी पंचायत समितीच्या मासिक सभेत मंदाणे गणातील पंचायत समिती सदस्या रोहिणी पवार यांनी मासिक सभेत मागणी केला.
विषयाचे गांभीर्य पहाता सर्व सदस्यांनी एकमताने विषयास संहमती दर्शवत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना वरील विषयावर निवेदन दिले.
यावेळी पं.स. उपसभापती वैशाली पाटील पं.स.सदस्या रोहिणी पवार,बानुमती ईशी,निमाबाई पटले, संगीताबाई पाटील,चंदनबाई पानपाटील,कमलबाई ठाकरे, रमणबाई पवार,ललिताबाई शेवाळे,रंगीलाबाई पावरा,
सरलाबाई ठाकरे,ललिता बाविस्कर,रत्नाबाई पवार, अरुणा भिल,पं.स.सदस्य गणेश पाटील,सत्यन वळवी, गोपी पावरा,सुदाम पाटील,विजयसिंग पावरा,किशोर पाटील,श्रीराम याईस,जयसिंग माळीच,प्रकाश पावरा,विरसिंग ठाकरे,सामाजिक कार्यकर्ते दिनेश पवार,किशोर पाटील, देवा पानपाटील आदी उपस्थित होते.