तळोदा l प्रतिनिधी
शहरात रामकृष्ण नगर मध्ये राहणारे प्रमोद कुलकर्णी यांच्या घराच्या कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चोरी केलेल्या चोरीमध्ये मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
याबाबात सविस्तर माहिती अशी की, तळोदा शहारातील रामकृष्णनगरमध्ये
प्रमोद रामदास कुलकर्णी हे त्यांच्या पत्नी व सौरव यांच्यासोबत राहतात.मंगळवारी दि.२३ रोजी त्यांच्या मोठ्या बहिणीकडे अहमदनगरला गेले होते.
शुक्रवारी दि.२७ रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ते घरी परतले असता दरवाज्याला कुलूप आढळून आले नाही. गावाला जाताना त्यांनी लाकडी व लोखंडी दोन्हीं दरवाज्यांना कुलूप लावले होते.
चोरट्यांनी लोखंडी व लाकडी दोन्हीं दरवाज्याचा कडी कोयंडा तोडलेला त्यांना दिसून आला.त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना घरातील बेडरूममधील कपाटातील सामान अत्यावस्थ दिसून आले.
कपाटाचे दरवाजे देखिल उघडे असून कपाटाच्या तिजोरी फोडलेली दिसून आली.चोरट्यांनी कपाटाच्या तिजोरीत ठेवलेल्या दोन सात ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या व दहा हजार रुपये रोख रक्कमेची चोरी केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घरातील दुसऱ्या बेडरूममध्ये देखिल प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातून समान बाहेर काढून कपाटात काही ठेवल्याचा शोध घेतला.मात्र त्याठिकाणी काही ठेवले नसल्याने त्यांना काही आढळून आले नाही. घरातील सोप्याजवळ एक दगड देखील आढळून आला.
यानंतर त्यांनी तळोदा पोलिस ठाण्यात चोरीच्या घटनेची माहिती दिली. त्यांनतर सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदार,बागुल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्रमोद कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादवरून अज्ञात चोरट्यांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान,भर वस्तीतील रहिवाशी भागात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.तळोदा शहरात एकदा चोरीला सुरुवात झाली की, चोरीचे सत्र थांबत नसल्याचा अनुभव आहे.भर वस्तीत चोरी करून चोरटयांनी पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे.