नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकावर आज दि.27 मे रोजी चार वाजेच्या सुमारास उधना पाळधी मेमो रेल्वेतून अज्ञात व्यक्तीनी उतरवून दोन युवकांवर सपासाप चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केले.
रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना खांडबारा रेल्वे स्थानकावरून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबत रेल्वेतील प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीवरून, नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकावर आज दि.27 मे रोजी चार वाजेच्या सुमारास उधना पाळधी मेमो रेल्वेच्या डब्यात दोन गटात वादविवाद झाला.त्यानंतर हाणामारी झाली. यादरम्यान दोन वेळेस रेल्वे चैन पुलीन करण्यात आली.
खांडबारा रेल्वे स्थानकावर एका गटातील दोघे युवक उतरले. रेल्वे सुरू झाल्याने चालत्या रेल्वेतून हल्लेखोर उतरले दोघांना चाकूने वार करून पुन्हा चालत्या रेल्वेतून अज्ञात मारेकऱ्यांनी पोबारा केला.
नवापूर तालुक्यातील खांडबारा बर्डीपाडा येथे राहणारे हे दोन युवक पॅसेंजर रेल्वेत पाणी बॉटल विक्रीचा व्यवसाय करीत आहेत.
दरम्यान त्यांचा अज्ञात व्यक्ती सोबत वादविवाद झाला त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात खांडबारा गावातील बर्डीपाडा भागात राहणारे जगदीश रमेश शिंदे (वय 21) यांच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आले आहे.तर
दशरत साहेबराव शिंदे (वय 20) यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आल्याची माहिती खांडबारा पोलीसांनी दिली आहे.
ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.सदर घटनेचा पोलिसांनी कसून चौकशी करून मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
खांडबारा रेल्वे स्थानकावर खांडबारा पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रविण आहिरे यांनी पाहणी केली. पुढील तपास रेल्वे पोलिस करीत आहे.दरम्यान ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दोघांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.