नंदुरबार ! प्रतिनिधी
आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा चांगला अभ्यास करता यावा यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात सर्व सुविधांनी युक्त असे सुसज्ज ग्रंथालय स्थापन करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास आमदार शिरीषकुमार नाईक, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अपर आयुक्त गिरीष सरोदे, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, तृप्ती धोडमिसे आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले , आदिवासी विद्यार्थींनी स्पर्धा परीक्षेच्या चांगला अभ्यास करुन डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आयएसआय ,आयपीएस अधिकारी व्हावे यासाठी नागरी सेवा परिक्षेच्या अभ्यासासाठी दिल्ली येथे प्रशिक्षण देण्यात येईल. दिल्लीत निवासाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी वसतिगृह सुरू करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात नागरी सेवा परिक्षेच्या अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षण केंन्द्र उभारण्यात येईल. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
जयपालसिंग मुंडा यांचे छायाचित्र प्रत्येक कार्यालयात व आश्रमशाळेत लावावेत व त्यांचे लेखन साहित्य विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी उपलब्ध करुन द्यावे. आदिवासी संस्कृती व आदिवासीच्या इतिहासाची माहिती पुढच्या पिढीला व्हावी यासाठी आदिवासी लेखकांना प्रोत्साहन देण्यात गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी प्रकल्प कार्यालय नंदुरबार,तळोदा, नाशिक, घोडेगाव, अकोले, भंडारा, अहेरी ,चंद्रपुर,चिमुर येथील आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजनेचा लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यशोगाथाचे सादरीकरण करण्यात आले. काही लाभार्थ्यांशी मंत्री महोदयांनी संवाद साधला व त्याच्या समस्या जाणुन घेतल्या.
नंदुरबार येथील इंग्रजी माध्यम शाळा, कनाशी ता.कळवण येथील शासकीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेंशियल स्कुल देवाडा येथील विद्यार्थ्यांशी ॲड. पाडवी यांनी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले अधिकारी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आयुक्त श्री. सोनवणे यांनी जागतिक आदिवासी दिनाविषयी माहिती दिली. लॉकडाऊन काळात आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात आलेल्या कामाचा अहवाल त्यांनी सादर केला.
प्रारंभी श्री.पाडवी यांनी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘आदि गौरव ’ पुस्तकाचे तसेच दशरथ मंडावी लिखीत ‘जयपालसिंग मुंडा’ यांच्या पुस्तकाचे अनावरण पालकमंत्री ॲड .पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर आयुक्त गिरीष सरोदे, सुत्रसंचालन सुचिता लासुरे व आभार प्रदर्शन नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. या ऑनलाइन कार्यक्रमास राज्यातील प्रकल्प अधिकारी, कर्मचारी, विद्याथी, पालक उपस्थित होते.