नंदुरबार ! प्रतिनिधी
अक्राणी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ग्रामस्थ रेशन धान्यापासून वंचित आहेत. मार्च ते जुलै या कालावधीत त्यांना रेशन मिळालेले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी काल जिल्हाधिकारी कार्यालय गाठत संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास पायपीट करीत मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, अक्राणी तालुक्यातील हातधूई येथील रेशन दुकानदाराने मार्च ते जुलै अखेरपर्यंत स्वस्त धान्य लाभार्थ्यांना दिले नाही. याबाबत लाभार्थ्यांनी संबंधितास विचारणा केली असता धमकी देण्यात येते. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदारांनी याची दखल घेत एका महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना देण्यात यावे, असा आदेश दिला आहे. खरे तर मार्च ते एप्रिल महिन्याचे धान्य मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केल आहे. यामुळे संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात यावी, सदर रेशन दुकान महिला बचत गटांना सुपूर्द करण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनावर हातधूई सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.