शहादा ! प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणे गावात भरवस्तीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत घरफोडी, कापड दुकानात हातसाफ करीत मोटारसायकल सह बकऱ्याही चोरून सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. गावात १७ महिन्यानंतर पुन्हा चोरट्यांनी डाव साधल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, शहादा तालुक्यातील पूर्व आदिवासी भागातील मोठ्या बाजारपेठ असलेल्या मंदाणे गावात भर वस्तीत बुधवारी दि.४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ठिकठिकाणी धुमाकूळ घालत चोरी करण्याचा डाव साधला.गावातील मुख्य बाजारपेठेच्या ग्रामपंचायत समोरील व्यापारी गाळ्यातील नथमल मोहनलाल शर्मा यांच्या धनवर्षा रेडिमेड व जनरल स्टोअर्समध्ये चोरट्यांनी शटर वाकवून प्रवेश केला व दुकानातील गल्ल्यात असलेले सुमारे सात हजार रुपये रोख रक्कम, दोन हजार किंमतीचे चांदीचे चार शिक्के तसेच १० हजार किंमतीचे लहान मुलांचे रेडिमेड कपडे, पंजाबी ड्रेस, पैठणीसह अन्य प्रकारच्या किंमती साड्या असे एकूण ह्या दुकानातून २७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या दुकानात टिकाव ने शटर वाकविले आहे . त्याच रात्री शिवाजी नगर भागातील मध्यवस्तीत राहणारे किशोर पंडित शिरसाठ (गाडीचालक) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. किशोर शिरसाठ हे १५ दिवसांपासून बाहेरगावी असल्याने घराला कुलूप असल्याने चोरट्यांनी बरोबर डाव साधला.त्यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी सर्व कुलूप तोडून संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त केले. गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून त्यात असलेल्या १० हजार रुपये किंमतीचे चार ग्राम वजनाच्या सोन्याच्या कानातील बाळ्या लंपास केल्या व किशोर शिरसाठ यांच्याच घरासमोर वास्तव्यास असलेले अमोल श्रीराम देवरे यांच्या घराच्या अंगणात गोविंद पावरा यांच्या मालकीची २५ हजार रुपये किंमतीची होंडा शाईन ही गाडी देखील चोरट्यांनी चोरून नेली.एवढयावरही चोरटे थांबले नाहीत.त्यांनी नारायण हिरामण भिल यांच्या घरासमोर बांधलेला ३ हजार रुपये किंमतीचा एक बोकड व ४ हजार रुपये किंमतीची एक शेळी चोरून नेली. असा एकूण ६१ हजार रुपयांचा एवज लुटून चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले.५ ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच एकच खळबळ उडाली.पोलीस पाटील सुभाष भिल यांनी घटनास्थळी येऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवांत, सारंगखेडा पोलीस निरीक्षक शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, असलोद पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार दिपक परदेशी, हवालदार चौरे, पो.कॉ.अमृत पाटील, अनमोल राठोड, विश्वास साळुंके आदिनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व लवकरच चोरांना पकडण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात नथमल शर्मा यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदाणे गावात एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकाच वेळी अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने चोरी करणारी मोठी सराईत टोळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच हा परिसर मध्यप्रदेश सीमेलगत असल्याने मंदाणे येथून अवघ्या ५-६ कि.मी.वरच मध्यप्रदेश सीमा आहे. त्यामुळे चोरटे मध्यप्रदेशात पळून गेले असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे.
मंदाणे गावात गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये साखळी पद्धतीने तब्बल ९-१० ठिकाणी चोरट्यांनी धाडसी चोऱ्या एकाच रात्रीतून केल्या होत्या. त्यात एका शिक्षक दाम्पत्याच्या घरी टाकलेल्या दरोड्यात सुमारे २५ लाखाचा ऐवज लंपास केला होता. त्याबद्दल अजून कोणतेही धागेदोरे मिळून आले नसल्याने पोलीस यंत्रणेबाबत तीव्र नाराजी आजही कायम असतांना पुन्हा १७ महिन्यानंतर त्याच पद्धतीने चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी चोरीची घटना आज गुरुवारी ५ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे .या घटनेमुळे चोरट्यांना पकडणे पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे ठाकले आहे.