नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील रनाळे येथील भरत रामचंद्र बारी सध्या तळोदा तालुक्यातील बोरद येथील तलाठी म्हणून कार्यरत आहेत.त्यांना आदर्श तलाठी पुरस्कार जाहीर झाला असून 1 मे रोजी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.
शासन महसुल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयअन्वये तलाठ्यांना प्रोत्साहन देण्याकरीता आदर्श तलाठी पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे . प्रस्तुत निर्णयानुसार दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातुन एका तलाठ्याची निवड करुन १ मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आदर्श तलाठी पुरस्कार म्हणुन रक्कम 5 हजाराचा धनादेश व प्रमाणपत्र या स्वरुपात देण्यात येतो. सदर पुरस्कार देण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषांनूसार निवड समितीची बैठक दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त , नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली व त्यात नंदूरबार जिल्ह्यातून तळोदा तालुक्यातील बोरद येथील तलाठी भरत रामचंद्र बारी यांची निवड करण्यात आली आहे.
1 मे रोजी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.भरत रामचंद्र बारी यांनी 11 वर्ष सेवा केली असून बोरद येथे गेल्या एका वर्षापासून तलाठी म्हणून कार्यरत आहेत.










