नंदुरबार l प्रतिनिधी
ऑलिंपिकच्या धर्तीवर बनवण्यात आलेल्या पालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. जलतरण तलावात पोहणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिलांसाठी स्वतंत्र बॅच असणार आहे अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.


नंदुरबार जिल्ह्यातील युवकांना जलतरणची सोय व्हावी. जलतरण स्पर्धेत जिल्ह्यातील युवक राष्ट्रीय पातळीवर चमकावेत यासाठी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांच्या पुढाकारातून नगरपरिषदेच्या माध्यमातून धुळे रस्त्यावर स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव साकारण्यात आलेले आहे. या तलावाचे उद्घाटन मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइनद्वारे केले होते. दोन वर्षांपूर्वीच जलतरण तलाव बांधून तयार करण्यात आले होते. परंतु, कोरोनामुळे शासनाचे निर्बंध आल्यावर तलाव सुरू होऊ शकला नाही.
सध्या कोरोनाचा परिस्थिती नियंत्रणात असल्याने तसेच शासन निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे आज १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जलतरण तलावाला सुरुवात होणार आहे. जलतरनासाठी अल्प फी ठेवण्यात आलेली आहे. जलतरणासाठी एजन्सी नेमण्यात आलेली आहे असून, ज्यांना पोहता येत नाही त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. सायंकाळी ५ ते ६ या एका तासाच्या कालावधीत महिलांसाठी स्वतंत्र बॅच असेल. महिलांच्या प्रतिसाद पाहून सकाळची बॅचसाठी निर्णय घेण्यात येईल.
जिल्ह्याचे नाव देश पातळीवर पोहोचेल
पालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव ऑलिंपिकच्या धर्तीवर बनवण्यात आले आहे. जलतरनासाठी जिल्ह्यातील युवकांना आता बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. जेणेकरून या तलावात युवकांना पोहण्यासाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. युवक व युवतींनी प्रशिक्षण घेऊन नंदुरबारचे नाव देशपातळीवर पोहोचवावे
चंद्रकांत रघुवंशी,माजी आमदार









