खापर l वार्ताहर
अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत सन 2017 ते 2021 या कालावधीत 14 वा व 15 वा वित्त आयोग,पेसा तसेच इतर योजनांच्या निधीतून झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी डाब गृप ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी तहसीलदार सचिन मस्के यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली आहे.
ग्रामस्थांनी तहसीलदार सचिन मस्के यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, तालुक्यातील डाब ग्रामपंचायतीला सन 2017 ते 2021 या कालावधीत पाच टक्के पेसा निधीचा सुमारे एक कोटी 95 लाख रुपये तर चौदावा व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत सन 2017 ते 2021 या पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे एक कोटी 85 लाख रुपये प्राप्त झाले आहेत तर विकासाच्या वेगळ्या योजनांतून ग्रामपंचायतीला इतर लाखो रुपयांचा निधी मिळाला आहे असे असतांना ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही गावात विकासाची कामे दिसून येत नाही. याबाबत ग्रामपंचायतीला विचारणा केली असता ग्रामपंचायत त्याची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. ग्रामपंचायतीकडे आलेला पैसा व खर्च झालेला पैसा याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यास ग्रामसेवक व सरपंच हे हेतुपुरस्कर टाळत आहेत. ग्रामपंचायतीत प्रशासकाच्या काळात ग्रामसेवक यांनी डी.एस.सी. प्रणालीचा वापर न करता लाखो रुपये परस्पर काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार देखील येथे अनेक वेळा घडला आहे.असे नमुद केले आहे.
निवेदनात पुढे, ग्रामपंचायतीतील कुकडखाडी -3, सोरापाडा -1, रोडा पाणी – 2,जांबा पाणी – 2, गेवालापाडा -1, परशीराईपाडा – 1,बेडापाणी – 1, खाणी गव्हाणपाडा – 1, राऊत पाडा – 13, मांजा बारापाडा – 1, गोंडापाडा – 2, तामनाहीपाडा – 3, तोरीकुवा -1, जुनवाईपाडा -1, उखलाई आंबा पाडा – 2, या पाड्यांमध्ये हातपंप लावण्यासाठी बोरवेल खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र दोन वर्षे उलटून देखील अद्यापपर्यंत तेथे हातपंप लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायती अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेत देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसत असुन ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असुन त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामपंचायतीच्या वर्तनावरुन दिसते. असे नमुद करत ग्रामपंचायतीला सन 2017 ते आज पर्यंत विविध योजनेतून मिळालेल्या निधीची व त्या निधीतुन झालेल्या कामांची योग्य ती चौकशी करुन पंधरा दिवसात ग्रामपंचायतीची चौकशी न झाल्यास तहसिल कार्यालयासमोर किंवा पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेवटी निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर अमृत मिऱ्या वळवी,भरत वाड्या पाडवी, विजय दातक्या वसावे, दिलवरसिंग सामा पाडवी यांच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रती पालकमंत्री,जिल्हाधिकारी,
मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, अक्कलकुवा यांना पाठविण्यात आल्या आहेत.