प्रकाशा l प्रतिनिधी
प्रकाशा ता. शहादा येथील प.पु.संत तोताराम महाराज मंदिर कालच्या (ता. २१) अग्नितांडवात स्वाहा झाले आहे. गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील यांनी आज (ता. २२) घटनास्थळी भेट दिली. यावेळी मंदिर पुनर्निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त करीत मंदिराच्या नवीन वास्तुसाठी त्यांनी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रूपये रोख स्वरूपात देणगी जाहीर केल्याने भाविकांची मनोधैर्य उचावले.
२१ एप्रिलला सकाळच्या सुमारास प्रकाशा येथील संत तोताराम महाराज मंदिराच्या वरच्या मजल्याला आग लागली होती. पुरातन काळातील या लाकडी दुमली मंदिराला आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण करीत चहूबाजूने लपेटले. शहादा, नंदुरबार येथील अग्नीशमन दलासह ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत मंदिर प्रचंड क्षतिग्रस्त झाले होते. गुजर समाजाचे एकमेव संत सदगुरु तोताराम महाराज मंदिराला समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील यांंनी आज भेट दिली. यावेळी मंदिराच्या ट्रस्टींसह प्रकाशा विकास संस्थेचे चेअरमन दिलीप पाटील, समाजाचे राज्य अध्यक्ष तथा केदारेश्वर सदगुरु धर्मशाळाचे चेअरमन मोहन पाटील, बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील, उपसभापती रविंद्र रावळ आणि वरिष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री.पाटील यांनी स्थितीचे गांभीर्य समजुन घेतले. त्या वेळी श्री पाटील म्हणाले की, हे मंदिर गुर्जर समाजाच्या एकमेव संत शिरोमणी सदगुरु तोताराम महाराजांचे अधिष्ठान असुन येणार्या भावी पिढीसाठी अजुन प्रखरतेने ह्या समाजवारसाचा परिचय व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील. मंदिराच्या नवीन वास्तुसाठी त्यांनी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रूपये देण्याची ग्वाही दिली. तसेच मंदिर नव निर्माणसाठी ज्याही अडचणी येतील त्या निस्तारण्याचा शब्द दिला. लवकरात लवकर नविन वास्तु उभारण्याच्या संकल्प उपस्थितांसमोर मांडला. दीपक पाटील यांच्या मंदिर पुनर्निर्माणच्या संकल्पनेबद्दल प्रकाशा ग्रामस्थाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.










